उरण: जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) बंदरातील कंटेनर वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर विविध उपाययोजना राबवल्या आहेत. यामुळे गेल्या 15 दिवसांहून अधिक काळ बंदरात अडकून पडलेल्या आणि सीएफएसकडे जाणाऱ्या कंटेनर्सची संख्या सुमारे 2500 वरून थेट 450 वर आली आहे.
पुढील आठवडाभरात ही संख्या नगण्य पातळीवर येण्याची अपेक्षा असून बंदराच्या लॉजिस्टिक व्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या तीव्र चालक टंचाईमुळे ही परिस्थिती उद्भवली होती, अशी माहिती जेएनपीए प्रशासनाने दिली आहे.
आजच्या घडीला बंदरात आयात कंटेनर्सच्या सरासरी दैनंदिन डिस्चार्जचे प्रमाण 12,237 टीईयू इतके असून, आयात-सीएफएस प्रलंबित कंटेनर्सची संख्या सध्या 40,809 टीईयू इतकी आहे. गेट मूव्हमेंटअंतर्गत एकूण 17,425 टीईयू हालचाल नोंदविण्यात आली असून, त्यामध्ये 7,950 टीईयू इनबाउंड तर 9,475 टीईयू आऊटबाउंड हालचालींचा समावेश आहे.
बंदरातील वाहतूक वेगाने वाढवण्यासाठी एनएसआयसीटी आणि एनएसआयजीटी येथून अमेया सीएफएससाठी ग्रीन चॅनेल मूव्हमेंट सुरू करण्यात आली असून कंटेनर्सच्या वाहतुकीसाठी नासकोवा संस्थेकडून 70 ते 80 ट्रॅक्टर ट्रेलर तैनात करण्यात आले आहेत.
या संकटकाळात केरी इंडेव्ह सीएफएसने जेएनपीएतील जीटीआय टर्मिनलच्या माध्यमातून मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंतच्या अवघ्या सहा तासांत 400 हून अधिक टीईयू कंटेनर्सची यशस्वी वाहतूक पूर्ण केली आहे.
तसेच, मागील 9 दिवसांत पोलारिस लॉजिस्टिक्स पार्क सीएफएससाठी 7,541 टीईयू कंटेनर्सची वाहतूक करण्यात आली असून एनएसआयजीटी बंदरातील प्रलंबित वाहतूक पूर्ण झाली आहे. एप्रिल 2026 मध्ये जेएन पोर्टमध्ये सरासरी गेट मूव्हमेंट 18,000 टीईयू इतकी नोंदविण्यात आली होती, तर मागील 24 तासांतील दैनंदिन गेट मूव्हमेंट 18,196 टीईयू आणि चालू वर्षातील एकूण दैनंदिन सरासरी गेट मूव्हमेंट 17,684 टीईयू इतकी आहे.
ही समस्या सोडवण्यासाठी जेएन पोर्टकडून संबंधित भागधारकांसोबत दररोज नियमित बैठका घेतल्या जात असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी 24 तास कार्यरत असणारा एक मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात आला आहे. बंदरातून जवळील सीएफएसपर्यंत अतिरिक्त रेल्वे वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून याद्वारे दररोज सुमारे 3 ते 4 रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत.
याशिवाय चालकांची कमतरता दूर करण्यासाठी जेएन पोर्टने पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून चालकांना आणण्यासाठी मालदा ते पनवेल यादरम्यान एक विशेष रेल्वेगाडी चालवली, तसेच अधिक चालक उपलब्ध व्हावेत म्हणून विविध वृत्तपत्रे व वाहिन्यांमध्ये जाहिरातीही प्रसिद्ध केल्या.