कोप्रोली ः भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जेएनपीएने आपल्या सागरी संचालनाच्या डिजिटलीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सर्वसमावेशक, कागदविरहित हार्बर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित केली आहे. जेएनपीएने स्वतःची स्वतंत्र आयव्हीटीएस कार्यान्वित केली असून, याआधी मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून राबविण्यात आलेल्या आणि वॉर्टसिला यांच्या सेवांवर आधारित व्हीटीएस व्यवस्थेपलीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सागरी संचालनातील विस्तृत स्वरूप आणि डेटा सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन जेएनपीएने मानक स्वरूपातील उपलब्ध उपाय स्वीकारण्याऐवजी बंदरे, जलमार्ग आणि किनारपट्टीसाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्र यांच्यासोबत भागीदारी करून स्वदेशी हार्बर मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करण्याचा निर्णय घेतला. ही प्रणाली जहाज वेळापत्रक नियोजन, पायलटेज माहिती, संसाधनांचे वाटप, आयओटी-आधारित इनपुट्स, सुरक्षितता निरीक्षण तसेच शाश्वतता मापन यांचा एकात्मिक समावेश करून जागतिक मानकांशी सुसंगत असा एकसंध कार्यप्रवाह प्रदान करणार आहे.
आयव्हीटीएसद्वारे एआयएस आधारित जहाज माहिती संकलन आधीच सुरू झाले असून, प्रणाली पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर ती टर्मिनल ऑपरेटर आणि सेवा पुरवठादारांना वास्तविक वेळेत कार्यरत दृश्य उपलब्ध करून देईल. यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि परिणामकारक होण्यास मदत मिळेल. पहिल्या टप्प्यातील डिजिटलीकरणाचा भाग म्हणून, मागील सहा महिन्यांपासून वापरात असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणच्या पायलट ‘थागवल’ ॲपद्वारे आता सर्व जहाज हालचालींचा डेटा पूर्णतः डिजिटल पद्धतीने संकलित केला जात आहे.
या ॲपमध्ये मास्टरच्या डिजिटल स्वाक्षरींसह संपूर्ण पायलटेज माहिती नोंदवली जाते, अहवाल निर्मितीची सुविधा उपलब्ध आहे, तसेच हे ॲप बंदराच्या बिलिंग प्रणाली आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक्स पोर्टल यांच्याशी एकात्मिक करण्यात आले आहे. प्रत्यक्षात माहिती नोंदविण्याची पद्धत टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत आहे.
दुसऱ्या टप्प्याची चाचणी सुरू
दुसऱ्या टप्प्याचे चाचणी प्रयोग सध्या सुरू असून, त्याअंतर्गत टग्स, पायलट लाँचेस आणि इतर नौका अशा सर्व लॉजिस्टिक साधनांपर्यंत डिजिटल डेटा संकलनाचा विस्तार करण्यात येत आहे. ही सुविधा 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः कार्यान्वित झाली आहे. लँडलॉर्ड पोर्ट मॉडेलअंतर्गत कंटेनर, द्रव आणि बहुउद्देशीय टर्मिनल्सचे संचालन खासगी संस्थांकडून केले जात असले तरी, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण सर्व ऑपरेटरना सागरी सेवा पुरवण्याची जबाबदारी कायम ठेवते. बंदरात पाच कंटेनर टर्मिनल्स, दोन द्रव टर्मिनल ऑपरेटर आणि एक बहुउद्देशीय बर्थ ऑपरेटर कार्यरत असल्याने, पारदर्शक, न्याय्य आणि कार्यक्षम सागरी सेवा सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली हार्बर मॅनेजमेंट सिस्टीम आणि रिअल-टाइम डेटा प्लॅटफॉर्म स्वीकारून जेएनपीए सर्व टर्मिनल ऑपरेटरसाठी सेवा पुरवठा अधिक सक्षम करत आहे. जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगतता साधत आहे. या परिवर्तनाचे सकारात्मक परिणाम सुधारित कार्यक्षमतेच्या स्वरूपात आधीच दिसून येत असून, यामुळे बंदराची स्पर्धात्मक क्षमता आणखी वाढेल.गौरव दयाल, अध्यक्ष,जेएनपीए