JNPA first double stack train Pudhari
रायगड

JNPA first double stack train: जेएनपीएची ‘डबल-स्टॅक’ झेप; मालवाहतुकीला वेग!

पहिली मालगाडी गुजरातकडे रवाना; ३६० टीईयू आयात मालाची वाहतूक

पुढारी वृत्तसेवा

उरण: जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) मालवाहतुकीच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या (डीएफसी) माध्यमातून पहिल्या लाँग-हॉल डबल-स्टॅक मालगाडीची यशस्वी वाहतूक करण्यात आली. तब्बल ३६० टीईयू आयात माल घेऊन ही मालगाडी २१ ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजता जेएनपीएहून गुजरातमधील वर्णामा येथील गतीशक्ती टर्मिनलच्या दिशेने रवाना झाली. बीएमसीटीमार्फत आलेला हा आयात माल असून, त्याचे संचालन पीएसएकडून केले जाते.

लाँग-हॉल डबल-स्टॅक रेल्वे वाहतुकीमुळे एकाच मालगाडीत अधिक कंटेनरची वाहतूक करणे शक्य होणार असल्याने जेएनपीएच्या रेल्वे मालवाहतुकीच्या क्षमतेत मोठी भर पडणार आहे. विशेषतः आयात कंटेनर बंदरातून जलद बाहेर काढणे शक्य होऊन ‘इम्पोर्ट ड्वेल टाइम’ अर्थात बंदरात कंटेनर पडून राहण्याचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.

परिणामी आयातदार, निर्यातदार आणि लॉजिस्टिक क्षेत्राला कमी वेळेत, अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम सेवा मिळणार आहे. या यशस्वी वाहतुकीतून जेएनपीएच्या उच्च क्षमतेच्या डबल-स्टॅक आणि लाँग-हॉल मालगाड्या हाताळण्याच्या पायाभूत सुविधांची क्षमता अधोरेखित झाली आहे.

लांब पल्ल्याच्या आयात-निर्यात मालासाठी रेल्वेचा अधिक सक्षम पर्याय उपलब्ध झाल्याने बंदरातून मालाचे निर्वहन वेगाने होणार असून, रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासही मदत होणार आहे.

डीएफसी नेटवर्कशी जेएनपीएची जोडणी अधिक मजबूत झाल्याने देशातील प्रमुख अंतर्गत मालवाहतूक केंद्रांशी संपर्क आणखी वेगवान होणार आहे. बंदरातून अंतर्गत भागात मोठ्या क्षमतेच्या रेल्वेगाड्यांद्वारे माल पोहोचल्याने वाहतुकीचा वेळ वाचणार, पुरवठा साखळी अधिक सुरळीत होणार आणि उद्योगांना साठा व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करता येणार आहे.

जेएनपीएच्या या उपक्रमामुळे भारताच्या आयात-निर्यात व्यापाराला अधिक वेग आणि कार्यक्षमता मिळण्याची अपेक्षा आहे. पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून जेएनपीए आपली भूमिका अधिक भक्कम करत आहे.

पहिल्या लाँग-हॉल डबल-स्टॅक डीएफसी मालगाडीची ही वाहतूक देशातील वेगवान, कार्यक्षम, विश्वासार्ह आणि स्पर्धात्मक मल्टिमोडल मालवाहतूक व्यवस्थेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT