Jayant Patil birthday pudhari photo
रायगड

Satej Patil : मविआसाठी पुरोगामी शक्तींनी एकत्र यावे

आमदार सतेज पाटील यांचे आवाहन; जयंत पाटील यांच्या संघर्षशील नेतृत्वाचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळा राजकीय व सामाजिक दृष्ट्या चांगलाच चर्चेचा ठरला. या कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जयंत पाटील यांची कौतुक करत मविआसाठी पुरोगामी शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहनही केले.

सतेज पाटील यांनी जयंत पाटील यांचे नेतृत्व केवळ रायगडपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राला लाभले पाहिजे. आजच्या राजकारणात विचारांवर ठाम राहणारे नेते दुर्मिळ होत असताना विधान परिषदेत त्यांनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडत अनेक प्रश्न मार्गी लावल्याचेही त्यांनी नमूद केले.

महायुती सरकारवर थेट निशाना साधताना सतेज पाटील यांनी, सरकारमध्ये विकासापेक्षा श्रेयासाठीच स्पर्धा सुरू असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेली अंतर्गत चढाओढ, बेरोजगारी, महागाई, स्मार्ट मीटर, वाढते वीजदर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे जनतेत तीव्र असंतोष आहे. पुरोगामी विचारांच्या सर्व पक्षांनी एकत्र राहिल्यास आगामी काळात महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'सावली ताई' यांच्याकडून आपत्तीग्रस्तांना धनादेश वाटप वाढदिवसाचे औचित्य साधून सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपणारे विविध पावसाळ्यात अंतर्गत नुकसान झालेल्या तालुक्यातील ५ गरजू व्यक्तींना मदतीसाठी अर्थसहाय्य म्हणून धनादेश (चेक) सुपूर्द करण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी 'टीम चित्रलेखा फॉर एन्व्हायर्नमेंट' सज्ज पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या सोहळ्यात 'टीम चित्रलेखा फॉर एन्व्हायर्नमेंट'चे शानदार उद्घाटन करण्यात आले.

आमदार जयंत पाटील यांनी आजच्या राजकारणात वैचारिक बांधिलकी कमी होत असल्याची खंत व्यक्त करत ते म्हणाले, "तरुण पिढीला राजकारणात येण्यापूर्वी शिक्षण, बौद्धिक तयारी आणि सामाजिक जाण आवश्यक आहे. केवळ पदे मिळविण्यापेक्षा विचारांचे कार्यकर्ते घडविण्यावर आपण भर दिला पाहिजे." असे ते म्हणाले. यावेळी आमदार नारायण पाटील, चित्रलेखा पाटील, मंदार वर्तक, ॲड. मानसी म्हात्रे, ॲड. गौतम पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रफुल्ल पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन संदीप जगे यांनी केले.

आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा!

भाजप सरकारला सत्तेवरून दूर करण्यासाठी सर्व पुरोगामी शक्तींनी एकजूट दाखविण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत जयंत पाटील यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना थेट कानमंत्र दिला. प्रत्येक कार्यकर्त्याने मतदार याद्यांची काटेकोर तपासणी करावी, गावागावांत संघटन मजबूत करावे आणि महाविकास आघाडीच्या विचारांचा तळागाळापर्यंत प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

दिग्गज नेत्यांची मांदियाळी

या सोहळ्याला आमदार नारायण पाटील, शेकाप महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष व उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्यासह शेकाप, काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT