कोप्रोली : पंकज ठाकूर
नेरुळ-बेलापूर-उरण लोकल मार्गावरील गव्हाण रेल्वे स्थानकाचे “गव्हाण-जासई” असे नाव न देता तसेच उदघाटन केल्यास तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा जासई ग्रामस्थांनी दिला आहे. गव्हाणप्रमाणेच जासई ग्रामस्थांचीही जमीन या प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आली असताना, स्थानकाच्या फलकावर फक्त “गव्हाण” असे नाव झळकविणे म्हणजे जासई ग्रामस्थांचा अपमान असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये उसळली आहे.
सोमवारी सिडको कार्यालयात जाऊन जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी 13 जुलै 2023 च्या सिडको ठरावानुसार “गव्हाण-जासई” असे नामविस्तार करावे, अशी ठाम मागणी केली. मात्र, सिडकोकडून ठराव होऊनही तो अंमलात आणला गेला नाही. दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते गव्हाण आणि तरघर या स्थानकांचे उद्घाटन करण्याची तयारी सुरु आहे. पण स्थानकाच्या फलकावर फक्त “गव्हाण” असे नाव दिसताच ग्रामस्थांचा संताप उसळला.
या संदर्भात जासई ग्रामपंचायतीकडून पुन्हा सिडकोला जाब विचारण्यात आला असून, नामविस्ताराची मागणी न ऐकली गेल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबू, असा निर्धार जासई ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या वेळी सरपंच संतोष घरत यांच्यासह सदस्य धीरज घरत, आदित्य घरत, विनायक घरत, संतोष कृष्णाजी घरत, अभिषेक घरत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.