

म्हसळा ः म्हसळा तालुक्यातील मेंडदी येथे शनिवारी रात्री एका 95 वर्षीय वृद्ध महादेव कांबळे आणि त्यांच्या पत्नी 83 वर्षीय विठाबाई कांबळे यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला होता. या हत्येचे गुढ उलगडले असून, प्रॉपर्टीच्या वादामुळे त्यांच्या दोन सख्खे मुलं नरेश महादेव कांबळे (वय 62) आणि चंद्रकांत महादेव कांबळे (वय 60) यांनीच वृद्ध आई, वडिलांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी घरातील परिस्थितीची पाहणी केली असता, पलंगावर वृद्ध दाम्पत्याची कुजलेला मृतदेह पाहून संशयास्पद मृत्यूची स्पष्ट चिन्हे दिसली. सख्ख्या मुलांनी घरातील प्रॉपर्टीच्या वादातून राग धरला होता आणि हा राग त्यांनी हत्येत रूपांतरित केला, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला.
घटनास्थळी पोहोचलेल्या म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, उपपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर येडवले, रोहिणकर, पोलीस शिपाई सागर चितारे, राजेंद्र म्हात्रे यांसह फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी सखोल तपास केला. त्यांनी घरातील प्रत्येक खोली, पलंग आणि फर्निचरची तपासणी करत महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले.
तपासात हे स्पष्ट झालं की, वृद्ध दाम्पत्य त्यांच्या मुलांना घरातील खर्चासाठी पुरेसे पैसे देत नसल्यामुळे त्यांनी काही काळासाठी मुलांना घरात राहण्यास मज्जाव केला होता. यामुळे नरेश आणि चंद्रकांत या दोघांमध्ये मनात राग निर्माण झाला, जो हळूहळू संतापात बदलला आणि त्यांनी आपल्या पालकांचा हत्या करण्याचं ठरवलं. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, दोघेही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या फिंगरप्रिंट आणि डॉग स्कॉडच्या मदतीने घटनास्थळी सखोल पुरावे जमा केले. तसेच, सदर प्रकरणाचे त्वरित फॉरेन्सिक विलेषण करण्यात आलं. ‘हत्येची ही योजना अगोदरपासून आखलेली होती, आणि ही हत्या प्रॉपर्टीच्या वादातून झाली आहे. फॉरेन्सिक पुरावे आणि ताब्यात घेण्यात आलेले मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत.’ अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगीतले.
‘घटना झाल्यानंतरच आम्ही घटनास्थळी त्वरित पोहोचलो आणि दोघे सख्ख्या मुलांना अटक केली. ही घटना म्हसळा तालुक्यातील वृद्धांची सुरक्षा आणि मुलांच्या कुटुंबातील तणावाचे गंभीर उदाहरण आहे.’ असेही त्यांनी सुचित केले. दरम्यान, या दोन्ही मुलांना म्हसळा पोलिसांनी अटक केली आहे.