Jal Jeevan Mission Review Meeting pudhari photo
रायगड

Bharat Gogawale | रायगड : जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करा

पालकमंत्री भरत गोगावले यांचे निर्देश; नेत्यांना निमंत्रण नसल्याने जि.प., पं.स. सदस्यांची बैठकीकडे पाठ

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नियमित, पुरेशा दाबाने आणि गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. प्रलंबित कामांसाठी निश्चित कालमर्यादा ठरवून त्यानुसार कार्यवाही करावी. कामांचा दर्जा, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि नागरिकांना होणारा पाणीपुरवठा यावर विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले. या बैठकीचे नेत्यांना निमंत्रण नसल्याने राष्ट्रवादीचे जि.प. व पं.स. सदस्यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली.

जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित जलजीवन मिशन योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री गोगावले म्हणाले, जलजीवन मिशन ही केंद्र व राज्य शासनाची ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई प्रतिदिन ५५ लिटर शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागातील माता-भगिनींचे पाण्यासाठी होणारे कष्ट कमी व्हावेत आणि प्रत्येक गावातील नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने शुद्ध पाणी मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे योजनेची कामे केवळ पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यापेक्षा त्यातून नागरिकांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना ‘हर घर नल से जल’ या संकल्पनेनुसार नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट या अभियानातून निश्चित करण्यात आले आहे.जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, कामांची गुणवत्ता, निर्धारित वेळेत पूर्तता आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत आहे किंवा नाही, याची वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.

आजच्या बैठकीचा उद्देश केवळ कामांचा आढावा घेणे नसून, योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करणे, प्रलंबित कामांना गती देणे आणि प्रत्येक गावापर्यंत योजनेचा प्रत्यक्ष लाभ पोहोचविणे हा असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पुण्याच्या संस्थेने केलेला सर्व्हे चुकीचा

रायगड जिल्ह्यामध्ये जलजीवनच्या योजनाचा केलेला सर्व्हे हा चुकीचा होता यामुळे अनेक योजना रखडल्या याची कल्पना आहे. अनेक त्रुटी आणि चुका आहेत. पुण्याच्या एका संस्थेने या योजनेचा सर्व्हे केला. परंतु सर्व्हे चुकीचा झाला असल्याची खंत पालकमंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी काळात पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करून या योजना पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा तसेच योजन पूर्ण न करता संपूर्ण पैसे घेतले आहेत अशा ठेकेदारांवर कारवाई करा असे आदेश गोगावले यांनी दिले.

नद्यांमधील गाळ काढण्याची कामे सुरू

जिल्ह्यातील काही ठिकाणी धरणांमधील तसेच नद्यांमधील गाळ काढण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. पाणी साठवण क्षमता वाढविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करणे आवश्यक असून, मागणीनुसार जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही गाळ काढण्याची कामे करण्यात येतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. जलजीवन मिशनअंतर्गत कामे पूर्ण केलेल्या काही ठेकेदारांची देयके प्रलंबित असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.

शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांची प्रलंबित देयके तातडीने अदा करण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री श्री. गोगावले यांनी दिले. जलजीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत पूर्ण करून त्यांचा प्रत्यक्ष लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी यावेळी दिले.

१३ नोव्हेंबर रोजी जलजीवनची बैठक होणार होती मात्र ती झाली नाही. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती तर आमच्या पक्षाच्या मंत्री आहेत त्यांनाही आमंत्रण द्यायला हवे होते त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हजर नव्हते.
मधुकर पाटील, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT