Raigad News Pudhari
रायगड

Raigad News: ईरशाळवाडी पुनर्वसित घरांची दुरवस्था! अवघ्या दोन वर्षांत छताला गळती

कंपनीच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

खोपोली: ईरशाळवाडी दरडग्रस्तांसाठी सिडकोने बांधून दिलेल्या पुनर्वसित घरांना अवघ्या दोन वर्षांतच मोठी गळती लागली आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे छतांतून आणि भिंतींमधून पाणी पाझरत असल्याने, पावसाळ्यात आदिवासी कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. पुनर्वसित बांधवांची विचारपूस करण्यासाठी कोणतेही राजकीय पुढारी फिरकत नसल्यामुळे रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ईरशाळवाडी गावाजवळील पाच किमीच्या अंतरावर असणाऱ्या शासनाच्या जागेत कायमची पक्की घरे बांधली आहेत. सदर घरे बांधण्यासाठी सिडकोने शिर्के कन्ट्रक्शन या बांधकाम कंपनीला जबाबदारी दिली होती.

शिर्के कन्ट्रक्शन या बांधकाम कंपनीने मोठे शर्तीचे प्रयत्न करत ४४ कुटुंबांना पक्की घरे बांधून दिली खरी परंतु दोन वर्षांमध्ये या घरांना तडे गेले आहेत. पावसाळ्यात पावसाचे पाणी पाझरत असल्याने घरांवर ताडपत्रीचा आधार घेतला आहे. तर पावसाच्या पाण्यामुळे घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

१९ जुलैच्या २०२३ च्या रात्रीला इरसाळवाडी गावच्या वरच्या भागात मातीचे ढिगारे असणारे उंच डोंगर या पावसाच्या पाण्याने खचल्याने रात्री दमूनभागून आलेली कुटुंबं झोपण्याच्या तयारीत असताना काही लहान मुले खेळण्या बागडण्यात व्यस्त असताना अचानक जोरदार आवाज झाला आणि दरड कोसळली आणि मातीचे ढिगारे खाली आले व वस्तीवर पडले. काही कळायच्या आत काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

यात निष्पाप अनेक जीव गेले तर मुकी जनावरे ही गेली आणि इरशाळवाडी उध्वस्त झाली. तर यातील बचावलेली काही मंडळी यांना तात्पुरते चौक गावाजवळील एक खाजगी मालकीच्या जागेत तात्पुरते पुनर्वसन केले.

मात्र पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी राज्य शासनाचे मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील प्रांत अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळीसह सर्वच शासनाचे अधिकारी येथील कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी कामाला लागले.

जवळपास पाच किमीच्या अंतरावर असणारे नानिवली गावाजवळ जवळपास साडेसहा एकर शासकीय जागेत ४४ कुटुंबांना पक्की घरे सिडकोच्या माध्यमातून शिर्के कन्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून बांधून दिली. मात्र येथील नागरिकांच्या डोळ्यात अश्रु अजूनही ओलेच असताना दिलेल्या घरांच्या कामाचा दर्जा समोर आला आहे. आता प्रशासन या कंपनीविरोधात काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकप्रतिनिधींची पाठ

पुनर्वसित घरांना गळतीबाबत माध्यमांनी आवाज उठवताच ठेकेदाराने तात्पुरती मलमपट्टी सुरू केली आहे. घरांची निगा राखण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ईरशाळवाडीचे पुनर्वसन करताना मंत्री, राजकीय पुढाऱ्यांमध्ये श्रेयवाद सुरू होता मात्र पावसाळ्यात घरांना गळती लागली असतानाही एकही पुढारी फिरकत नसल्याची संतापजनक प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT