रायगड: युद्ध परिस्थिती आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली विविध आव्हाने यावर मात करत भारताच्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 72,325.82 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. मरीन प्रोडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या (एमपीईडीए) आकडेवारीनुसार, देशाच्या या यशात महाराष्ट्राच्या, विशेषतः कोकण किनारपट्टीचा सिंहाचा वाटा आहे.
राज्य मत्स्यव्यवसाय विभाग आणि सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएमएफआरआय) च्या अहवालानुसार, महाराष्ट्राच्या सागरी निर्यातीमुळे देशाच्या तिजोरीत तब्बल 7,343 कोटी 41 लाख रुपयांचे परकीय चलन जमा झाले आहे.
या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचे एकूण सागरी मत्स्योत्पादन 3 लाख 10 हजार 777 मेट्रिक टनांवर पोहोचले असून, कोकणात सुमारे 8,500 ते 9,000 कोटी रुपयांची भव्य आर्थिक उलाढाल झाली आहे.
जागतिक बाजारपेठेत भारताच्या गोठवलेली कोळंबीचा (फ्रोझन श्रिम्प) निर्यातीत दोन-तृतीयांशपेक्षा अधिक वाटा आहे. कोकणातून निर्यात झालेल्या एकूण मत्स्यसाठ्यात कोळंबीचा वाटा 65 टक्के आहे.
कोळंबीसोबतच कोकणतील पांढरे-काळे पापलेट, सुरमई, बांगडा, स्क्विड आणि रिबन फिश यांची मुंबईतील ससून डॉक व उरणच्या जेएनपीए बंदरातून विक्रमी निर्यात झाली.