रायगडः जागतीक स्तरावर ब्रॉडबॅन्ड वापरात मोठा देश अशी ओळख निर्माण केलेल्या भारतातील ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असून नोव्हेंबर 2025 अखेर या ग्राहक संख्येने एक अब्ज (100 कोटी) चा आकडा पार केला. गेल्या 10 वर्षांत, भारतातील ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत सहा पटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
नोव्हेंबर 2015 च्या अखेरीस देशातील ब्रॉडबँड ग्राहक 13.15 कोटी (131.49 दशलक्ष ) होते, ती ब्रॉडबँड ग्राहक संख्या नोव्हेंबर 2025 च्या अखेरीस वाढून 1 अब्ज (100.37 कोटी) झाली आहे. देशात ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत उत्तर प्रदेश प्रथम तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.
ब्रॉडबँड सेवांवर दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) नियंत्रण असते. नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारी आणि ट्रेंडच्या आधारावर, उपलब्ध माहिती नुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्य, त्याच बरोबर मोठ्या प्रमाणातील शहरीकरणामुळे ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
मोबाईल ब्रॉडबँडचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 95 टक्के पेक्षा जास्त ग्राहक हे मोबाईल वा वायरलेस ब्रॉडबँड वापरणारे आहेत.मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या मेट्रो शहरांत हे प्रमाण अधिक आहे. वायरलाईन ब्रॉडबँडमध्ये, दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील शहरी आणि आयटी हब असलेल्या राज्यांमध्ये ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. येथे फायबर कनेक्टिव्हिटीची मागणी जास्त असल्यचे दिसून येत आहे.