Murbad illegal soil transport Pudhari
रायगड

Murbad illegal soil transport: पाच हायवा ट्रक्सवर कारवाई; पण लाखो ब्रास माती गिळणाऱ्या यंत्रणेचे काय?

‌‘झोपेचे सोंग‌’ घेतलेल्या प्रशासनाला जाग आली की केवळ दिखावा?

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड शहर: गेल्या अनेक महिन्यांपासून मुरबाड तालुक्यातील डोंगर, टेकड्या आणि नैसर्गिक संपत्ती अक्षरशः पोखरून काढत दिवस-रात्र शेकडो हायवा ट्रक्सच्या माध्यमातून मुंबई-ठाणे दिशेने सुरू असलेल्या अवैध माती वाहतुकीबाबत वारंवार आवाज उठविला जात होता.

क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात माती भरून भरधाव वेगाने धावणाऱ्या या ट्रक्समुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे चित्र सातत्याने समोर येत होते. याबाबत ‌‘पुढारी‌’ने वेळोवेळी सडेतोड आणि परखड वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने यांनी तहसीलदार व पोलिस प्रशासनाला निवेदन देत अवैध माती वाहतुकीमागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. “आठ दिवसांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला होता. मात्र त्या वेळी प्रशासनाने नेहमीप्रमाणे ‌‘सर्व काही आलबेल‌’ असल्याचे भासवत या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्षच केल्याचे चित्र होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवीन उड्डाणपुलावर भरधाव धावणाऱ्या एका हायवा ट्रकचा टायर फुटल्याने मोठी दुर्घटना टळली आणि पुन्हा एकदा या माती वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर अखेर गुरुवारी रात्री प्रशासनाने पाच हायवा ट्रक्सवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. नायब तहसीलदार अमोल शिंदे यांनी संबंधित वाहनांबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिल्याचे सांगितले जात आहे.

मात्र या कारवाईनंतर आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढे महिने प्रशासन नेमके काय करत होते? तालुक्यातून रोजच्या रोज होणारी अवैध माती वाहतूक महसूल, पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या नजरेतून खरोखरच सुटली होती का? की सर्व काही माहिती असूनही ‌‘सोयीस्कर शांतता‌’ पाळली जात होती?

तसेच, कारवाई फक्त पाच वाहनांपुरतीच का? उर्वरित शेकडो ट्रक्स गायब झाले का? की कारवाईची ‌‘चाहूल‌’ लागताच ते सावध झाले? तसेच ही कारवाई खरोखर माती माफियांवर अंकुश ठेवण्यासाठी आहे की वाढता जनक्षोभ शांत करण्यासाठीची औपचारिकता? अशी चर्चा नागरिकांमध्ये आता रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT