अलिबाग तालुक्यातील ऐतिहासिक देवभूमी ‌‘चौल नगरी‌’ pudhari photo
रायगड

Alibag tourism : अलिबाग तालुक्यातील ऐतिहासिक देवभूमी ‌‘चौल नगरी‌’

निसर्गरम्य रेवदंडा-चौलमध्ये कोणत्याही ऋतुमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय आणि भक्तिमय असते

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : प्राची चोगले-घरत

रेवदंडा-चौल म्हटलं की, अथांग पसरलेला समुद्र, नारळ-सुपारीच्या मोठमोठ्या बागा, 350 वर्षे जुन्या मंदिराची असलेली परंपरा आणि ऐतिहासिक स्थळे होय. या निसर्गरम्य रेवदंडा-चौलमध्ये कोणत्याही ऋतुमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय आणि भक्तिमय असते. येथे अथांग समुद्र किनारा, वळणावळणाचे रस्ते, असा हा परिसर निसर्गरम्य आणि ऐतिहासिकदृष्ट्‌‍या महत्त्वाचा आहे.

चौल हे इतिहासाची साक्ष देणारे व आंग्रेकालीन एक प्रमुख ठिकाण आहे. साधारणतः 300 ते 350 मंदिरे अस्तित्वात होती त्यातील एक महत्वाचे मंदिर म्हणजे श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर हे येथील प्राचीन आणि चौलचे ग्रामदैवत. या मंदिराचे वैशिष्ट्‌‍य म्हणजे या मंदिराच्या सभामंडपात फरशीखाली तीन कुंडे आहेत पर्जन्यकुंड, वायुकुंड व अग्निकुंड. मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याच प्राचीन वास्तू व खाणाखुणा सापडतात. मंदिराच्या एका बाजूला सलग एका रेषेत नऊ छोट्या दगडी पिंडी दिसतात. मंदिराच्या मागच्या बाजूला पाच दगडी शिळा ठेवलेल्या आहेत.

नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी श्री एकविरा भगवती देवीचे हे मंदिर आहे. त्याचप्रमाणेच यज्ञकुंडात दरवर्षी नवरात्रीच्या नवव्या दिवशी रात्री होम केला जातो. या दिवशी मंदिरात गावकरी बांधवासह कोळी भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळते.चौलमधील प्रसिद्ध व पुरातन अशा सात देव्यांपैकी एक देवी म्हणून शितळादेवीची आख्यायिका आहे. चौल नाक्यापासून साधारणतः 2 कि.मी.अंतरावर हे पुरातन मंदिर आजही फार प्रसिद्ध आहे.

देवीचे स्थान जागृत समजले जाते तेथेच खोकलु देवी, खरजु देवी, गुलमा देवी. खोकला, खरुज अंगावर गुलम येतात तेव्हा या देविंची उपासना केली जाते. तसेच चौलचे दत्तमंदिर हे रायगड जिल्ह्यातील चौल गावाच्या जवळ भोवाळे या निसर्गरम्य गावात एका टेकडीवर आहे. हे मंदिर पर्वतवासी श्री दत्तात्रेयांचे देवस्थान म्हणून ओळखले जाते. हे 18 व्या शतकात बांधले गेले असून, दत्त जयंतीला येथे पाच दिवस मोठी यात्रा भरते. या चौल मधील धार्मिक स्थळी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात.

चौल हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक बंदर आहे, जे एकेकाळी ‌’चंपावती‌’ किंवा ‌’चंपावती नगरी‌’ म्हणून ओळखले जात होते. हे सातवाहनकालीन बंदर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रसिद्ध होते आणि इजिप्त, ग्रीस, चीन आणि आखातातील देशांशी व्यापार चालत असे. हजारो वर्षांच्या इतिहासात व्यापार आणि उद्योजकतेचे आणि त्याबरोबर येणाऱ्या राजकीय संघर्षाचे साक्षीदार असलेले किल्ले, लेणी, बंदरे आपण आजही कोकणात पाहू शकतो.

चौल-रेवदंडाचा सागरतीर आणि दक्षिण दिशेला कुंडलिका नदीचे मुख आणि त्याच्या पलीकडे असलेला डोंगरावरील पोर्तुगीज कोर्लई किल्ला. सागरी महामार्गाने अलिबागहून सुमारे 18-20 किलोमीटर दक्षिणेला गेलं की आपण चौलला पोहोचतो. चौलच्या नारळ सुपारीच्या बागा या परिसरावर मायेची सावली धरून आहेत. या माडांच्या बनात लपलेला आहे. पोर्तुगीजांचे बलाढ्य ठाणे असलेला किल्ला. किल्ल्याच्या उत्तर तटाला लागून जिथं डांबरी रस्ता किल्ल्यात शिरतो तिथंच जवळ किल्ल्याचे दार आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला रेवदंड्याचा समुद्रकिनारा आहे पूर्वेला खाजण आहे आणि उत्तरेला चौल गाव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT