Hind Di Chadar program Pudhari
रायगड

Hind Di Chadar program: ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज; कोणतीही त्रुटी राहू देऊ नका – डॉ. विजय सूर्यवंशी

खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी भव्य शहिदी समागम; 25 समित्यांच्या माध्यमातून व्यापक तयारी

पुढारी वृत्तसेवा

रायगड : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‌‘हिंद दी चादर‌’ या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासनाने दक्षतेने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी आज सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपायुक्त विजय म्हसाळ, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, रश्मी करंदीकर, नियोजन उपायुक्त प्रमोद केंभावी,कार्यक्रमाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र राठोड यांच्यासह कोकण विभागातील महसूल, शिक्षण, आरोग्य, महानगरपालिका, पोलीस विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जेएनपीए आणि सिडकोचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीव्दारे या बैठकीस उपस्थित होते.

खारघर येथे भव्य कार्यक्रम

आढावा बैठकीत कार्यक्रमाची एकूण रूपरेषा, जनजागृती, प्रभात फेऱ्या, विद्यार्थी व युवकांचा सहभाग, मुख्य सोहळ्याचे नियोजन तसेच कायदा-सुव्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता व आरोग्य सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली.“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशस्वीततेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे.

25 समित्यांची स्थापना

कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनासाठी शासकीय अधिकारी, गुरुद्वारा प्रशासन तसेच विविध समाजघटकांच्या सहभागातून तब्बल 25 समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा त्याग, शौर्याचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केले. नागपूर व नांदेड येथे हा समागम यशस्वीरित्या पार पडला असून, खारघर येथे होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमासाठीही अत्यंत शिस्तबद्ध आणि सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या मार्गदर्शनाखाली “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वा शहिदी समागम कार्यक्रम समितीच्या तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव, वारकरी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

परदेशातूनही भाविक येणार

रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी “हिंद दी चादर“ कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमासाठी नवी मुंबईसह मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून तसेच परदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, भोजन, निवास, प्रसिद्धी, जलपुरवठा, विद्युत व्यवस्था आदी सर्व बाबींसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यानुषंगाने प्रशासनाव्दारे सर्वंकष तयारी करण्यात येत आहे. सामाजिक ऐक्य, सद्भावना व ऐतिहासिक मूल्यांची जाणीव

नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेऊन कार्यक्रम शिस्तबद्ध, शांततापूर्ण व उत्साहात पार पाडावा यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. तसेच सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, प्रत्येक विभागाने प्रचार व प्रसाराचे नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी सर्व यंत्रणांना दिले. ‌‘हिंद दी चादर‌’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, सद्भावना व ऐतिहासिक मूल्यांची जाणीव निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT