तळोजात ‌‘हाय व्हॅल्यू‌’ ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश pudhari photo
रायगड

Illegal Drugs Seizure : तळोजात ‌‘हाय व्हॅल्यू‌’ ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

पंजाबच्या 2 भावांकडून 1 कोटींचे हेरॉईन जप्त

पुढारी वृत्तसेवा

पनवेल ः विक्रम बाबर

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यांतील तळोजा येथे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटी 2 लाख 19 हजार 500 रुपयांचे हेरॉईन आणि अफिम हे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

घोट कॅम्प परिसरातील महावीर मॅजेस्टी इमारतीत राहणाऱ्या पंजाबमधील सुरींदर गुरुजंत सिंग उर्फ काळु (वय 24) आणि मनिंदर गुरुजंत सिंग (वय 27) या दोघा सख्ख्या भावांना अटक करण्यात आली असून, या कारवाईमुळे तळोजा परिसरात सुरू असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा मोठा धागा पोलीसांच्या हाती लागला आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे तसेच पोलीस उपआयुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. त्याच मोहिमेंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाला 23 फेब्रुवारी रोजी प्राप्त खात्रीलायक गुप्त माहितीची खातरजमा करुन ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

118 ग्रॅम हेरॉईन आणि 143.6 ग्रॅम अफिम हस्तगत

तळोजा येथील घोट कॅम्पमधील महावीर मॅजेस्टी येथे सुरींदर सिंग उर्फ काळु आणि त्याचा भाऊ मनिंदर सिंग हे हेरॉईनची विक्री करतात. त्यांच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा ठेवण्यात आला आहे, अशी माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचला आणि छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुरींदर गुरुजंत सिंग उर्फ काळु आणि मनिंदर गुरुजंत सिंग दोघेही मूळ पंजाब राज्यातील मोगा जिल्ह्यातील निहालसिंगवाल येथे राहाणारे आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात घेवून, त्यांच्या घरातून 118 ग्रॅम हेरॉईन आणि 143.6 ग्रॅम अफिम असा एकूण 1 कोटी 2 लाख 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अंमली पदार्थ आणण्यासाठी ट्रान्सपोर्ट नेटवर्कचा वापर, ट्रक चालक फरक पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न माहिती नुसार हा साठा स्थानिक पातळीवर विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात एका ट्रक चालकाचाही सहभाग असल्याचा संशय असून तो सध्या फरार आहे.

पंजाबमधून अंमली पदार्थ महाराष्ट्रात आणण्यासाठी ट्रक ट्रान्सपोर्ट नेटवर्कचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कलम 8 (सी), 21 (बी), 17 आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार माने यांच्या विशेष पोलिस पथकांने हा छापा टाकला.

तळोजा बनतोय अंमली पदार्थांचा अड्डा

तळोजा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. घोट कॅम्पसारख्या निवासी भागातच ड्रग्जचा साठा ठेवला जात असल्याचे उघड झाल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले हेरॉईन उच्च प्रतीचे असून त्याची बाजारातील किंमत मोठी आहे. हे अंमली पदार्थ लहान-लहान पॅकेट्समध्ये विभागून किरकोळ विक्रेत्यांमार्फत वितरित केले जाणार होते, अशी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT