पनवेल : हेदुटणे येथील दगडखाणी बंद करण्यासाठी आदिवासी नागरिकांनी 11 मार्च रोजी पनवेल तहसील कार्यालय, साईनगर या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केले.
हेदुटणे परिसरामध्ये सुरू असलेल्या दगड खाणीच्या कामामुळे गावातील नागरिकांचे जीवन धोकादायक झाले आहे. स्फोटक ब्लास्टिंगमुळे घरांच्या भिंतींना तडे गेले असून अनेक घरे पडण्याच्या अवस्थेत आहेत. मोठ्या प्रमाणावर उडणारी धूळ आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
पिण्याचे पाणी दूषित झाले असून शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे. खाणीलगत प्राथमिक शाळा असून लहान मुले शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांच्या जीविताला धोका असल्याचे आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. दगड खाणीतील ट्रक, डंपर, अवजड वाहने गावातून जात असल्याने अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे.
याबाबत महसूल प्रशासन, पोलीस विभाग आणि संबंधित कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी तक्रार देण्यात आली. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले.
यावेळी दगडखाणी तात्काळ बंद करण्यात याव्यात. गावकऱ्यांच्या जीवित आणि संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी पोलीस सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, दगडखाण मालक आणि संबंधितांवर ॲट्रॉसिटी तसेच पर्यावरण व महसूल कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.