Heavy water flow from waterfall near Konjhar on Fort Raigad road, traffic closed
रायगड : पुढारी वृत्तसेवा
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड मार्गावर कोंझरच्या वर उजव्या हाताला असलेल्या धबधब्यातून मोठ्या प्रमाणात जलप्रवाह निर्माण झाला आहे. त्यामुळे तेथील मोरी लगत निर्माण केलेला पर्यायी मार्ग मुसळधार पावसाने खचला आहे. त्यामुळे रायगड मार्ग आता प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती डीवायएसपी शंकर काळे यांनी दैनिक पुढारीशी भ्रमणध्वनीद्वारे बोलताना दिली आहे.
आज सकाळी या परिसरातील नागरिकांकडून हे वृत्त प्राप्त होताच डीवायएसपी काळे आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी पोहोचले. मुसळधार पावसामुळे हा मार्ग आता नागरिकांसाठी व वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याचे त्यांनी पुढारीशी बोलताना स्पष्ट केले.
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हे घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मागील दोन ते अडीच वर्षांपासून या मार्गावरील महामार्गाची कामे या ठेकेदारामार्फत सुरू आहेत. मागील पावसाळ्यापासूनच या मार्गावर करण्यात येत असलेल्या कामाच्या विरोधात स्थानिक नागरिकांकडून तीव्र हरकती व आंदोलने करण्यात आली होती.
सध्या या मार्गावरील तीन ते चार ठिकाणी मोऱ्यांची कामे अर्धवट अवस्थेत असून, लाडवली पुलाचे काम देखील रखडले आहे. या विरोधात दोन दिवसांपूर्वीच खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना समक्ष जागेवर बोलवून धारेवर धरले होते. चार दिवसांमध्ये हा मार्ग योग्य पद्धतीने सुरळीत करावा असे निर्देश दिले होते. मात्र ठेकेदाराने या मार्गाची असलेली महती लक्षात न घेताच अत्यंत निष्काळजीपणाने काम केल्याचे दिसून येत असल्याने परिसरातील नागरिकांमधून व शिवभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.