उरण ः जेएनपीए परिसरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी दळणवळण सुरळीत होण्यासाठी जेएनपीए आणि राष्ट्रीय महामार्गाने सहा पदरी रस्ते बनविले आहेत .त्याच बरोबर अपघात कमी होण्याच्या दृष्टीकोनातून छोट्या वाहनांसाठी सेवा रस्ते बनविले आहेत . मात्र या मार्गांवर छोटी वाहने न चालता रिकामे कंटेनर यार्ड गोदामांच्या अवजड वाहतुकीने त्याचा ताबा घेतला असल्याने अपघातात वाढ होत आहेत.त्यामुळे या सेवा मार्गांवरील अवजड वाहतुकीची पार्किंग बंद करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जेएनपीए बंदराची निर्मिती झाल्यावर या विभागात काही प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाल्याने काही भूमिपुत्रांना रोजगार मिळाला हे खरे असले तरी जरी रोजगार मिळाला असला तरी प्रकल्पग्रस्त गावांना अनेक समस्या निर्माण झाल्या.या गावांच्या अवतीभवती जेएनपीए बंदरातील माल साठविण्याची अनेक गोदामे सुरू झाली. पर्यायाने या विभागात अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली.
अनेक गोदामे बेकायदेशीरपणे उभारण्यात आली आहेत. जेएनपीए आणि एनएचएआयने वाहतूक कोंडी आणि अपघातला पर्याय म्हणून नव्याने सहा पदरी आणि सेवा रस्ते उभारले मात्र या उभारलेल्या सेवा मार्गावर बेकायदेशीर उभारलेल्या गोदामांची अनेक अवजड वाहने रस्त्यावरच पार्कींग करून ठेवण्यात येत आहेत.
तसेच याच मार्गातील सेवा रोडवरून चिर्ले, पुलाखालून धुतूम अंडर पासखालून अवजड वाहने येऊ लागली आहेत. यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची समस्या उद्भवत आहे. नॅशनल हायवे चे नियोजन शून्य कारभार याच्यातून दिसून येत आहे. याकडेही नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
द्रोणागिरी नोड,गव्हाणफाट्यावर वाहतूक कोंडी
तालुक्यातील द्रोणागिरी नोड,खोपटे कोप्रोली रस्त्यावर ,दिघोडे -गव्हाण फाटा रस्त्यावर अनेक अवजड ट्रेलर्स नेहमी बेकायदेशीरपणे उभे असतात.त्यामुळे या प्रवासी रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी , नोकरवर्ग सामान्य जनतेच्या वाहनांना वाहतूक कोंडीचा नेहमी सामना करावा लागतो.पर्यायाने वाहतूक कोंडीतून वाट काढताना अनेक दुचाकी,तिचाकी स्वार या उंभ्या अवजड वाहनांना जाऊन धडकल्याने अनेक अपघात हकनाक होत आहेत.नुकताच भेंडखळ येथील युवकांचा खोपटा पूल नवघर मार्गांवरील बामर लॉरी गोदामा जवळ अपघात होऊन मृत्यू झाला.
प्रत्येक गोदाम मालकांनी आपल्या पार्किंग चे नियोजन केले तर रस्त्यावर एकही वाहन उभे राहणार नाही .आज या रस्त्यावरील पार्किंग मुळे अपघात होत आहेत वाहतूक कोंडी होत आहे. हे प्रशासनाला दिसून ही डोळे झाक करीत आहे.मात्र हे थांबले नाही तर जनता रस्त्यावर उतरेल.विजय भोईर रायगड जिल्हापरिषद सदस्य