रायगड ः जिल्हाधिकाऱ्यांनी अलिबाग तालुक्यातील मांडवा ते अलिबाग मार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी अटी-शर्तीवर बंदी घालण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी यांचे आदेश झुगारून या मार्गावरून अवजड वाहतूक सुसाट सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
मांडवा येथे रो-रो जेटीसह अन्य प्रवासी जलवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकडून अलिबागला येणारे व अलिबागवरून मुंबईकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रायगड हा पर्यटन जिल्हा असत्याने अलिबाग, मांडवा, किहीम, आक्षी, नागाव येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आपली वाहने घेऊन येत असतात. अलिबाग ते मांडव्याला वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमच भेडसावत आहे. चोंढी व इतर ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांसह विद्यार्थी व पर्यटकांना करावा लागत आहे. वाहतूककोंडी सोडविताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आजारी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडल्याने रुग्णाच्या जीवितास धोका संभावू शकतो.
अपघात कमी होण्यासाठी तसेच स्थानिक नागरिक, विद्यार्थी व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मांडवा जेट्टी ते अलिबाग या मार्गावर अवजड वाहनांना वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली.
दररोज सकाळी आठ ते दुपारी बारा तसेच सायंकाळी चार ते रात्री आठ पावेळेत जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, जीवनाश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता अन्य जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदीचे आदेश दिले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या दुसन्या आठवड्यात हे आदेश काढण्यात आले होते. सुरुवातीच्या कालावधीत या नियमांचे पालन करण्यात आले, त्यानंतर अनेक अवजड वाहने या रस्त्यावरून सुसाट धावत आहेत.