Raigad Farmer Relief Rain
सुवर्णा दिवेकर
अलिबाग : आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. रविवारी पहाटेपासून जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे
मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अजून मधून पावसाचे एखादी सर कोसळत होती. मात्र आज अलिबाग, पेण, पनवेल, उरण, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, मुरूड, तळा, सुधागड, कर्जत आणि खालापूर तालुक्यांसह बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. आजच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भात लागवडीनंतरची अनेक शेतीकामे खोळंबली होती. पाण्याअभावी काही ठिकाणी भात रोपांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र नव्याने झालेल्या पावसामुळे भातशेतीला आवश्यक ओलावा मिळाला असून तणनियंत्रण, खत व्यवस्थापन आणि इतर शेतीकामांना पुन्हा वेग येणार आहे.
यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भात रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही भागात शेती पाण्याखाली गेली होती, तर शेतकऱ्यांना नव्याने रोपवाटिका तयार करण्याची वेळ आली होती. त्यानंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने शेतीचे नियोजन विस्कळीत झाले होते.
आता पुन्हा पावसाने दमदार पुनरागमन केल्याने खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली असून त्यामुळे खरीप पिकांना फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्येही वाढ होणार असून, ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.