Heavy rain disrupted traffic on Raigad road!
मुसळधार पावसाने रायगड मार्गावरील वाहतूक विस्‍कळीत! Pudhari Photo
रायगड

मुसळधार पावसाने रायगड मार्गावरील वाहतूक दुसऱ्यांदा विस्कळीत!

पुढारी वृत्तसेवा

रायगड : पुढारी वृत्‍तसेवा

गेल्या २४ तासांपासून महाड तालुक्यात मुसळधार पाउस सुरू आहे. यामुळे रायगड विभागातील राष्ट्रीय महामार्गाचे लाडवली जवळ सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे. त्‍यामुळे हा मार्ग मागील ७२ तासात सलग दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला. यामुळे या मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आगामी दोन दिवसात महाड परिसरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसाने लाडवली परिसरातील सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाच्या कामाजवळ भरावामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ते आता पर्यायी मार्गावरून वाहण्यास सुरुवात झाली आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, स्थानिक प्रशासनामार्फत तशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान ठेकेदारांचे काम संथ गतीनेच सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून ठेकेदाराच्या कार्यपद्धती विरोधात पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

SCROLL FOR NEXT