Pen Taluka Flood Damage  Pudhari
रायगड

Raigad Heavy Rain | मुसळधार पावसाचा शिर्कीत तडाखा; मिठशेतीचे बांध उध्वस्त, हजारो गोण्या मीठ व भात भिजला

मिठशेतीचे बांध फुटल्याने सुमारे दीडशे एकर क्षेत्रातील मिठउत्पादनावर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

Pen Taluka Flood Damage

कमलेश ठाकूर

पेण : गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने पेण तालुक्यातील खारेपाट परिसरातील शिर्की येथे मोठे नुकसान झाले आहे. मिठशेतीचे बांध फुटल्याने सुमारे दीडशे एकर क्षेत्रातील मिठउत्पादनावर परिणाम झाला असून हजारो गोण्या मीठ पावसाच्या पाण्यात भिजले आहेत. त्याचबरोबर शासकीय भात खरेदी केंद्रातील मोठ्या प्रमाणावरील भातही पावसामुळे भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शिर्की येथील सद्गुरू कृपा नाविन्यपूर्ण सहकारी संस्थेच्या संचालिका वंदना म्हात्रे आणि संचालक कल्पेश पाटील हे सुमारे दीडशे एकर क्षेत्रात समुद्राचे खारे पाणी साठवून नैसर्गिक पद्धतीने मीठ उत्पादन करतात. वर्षभर शेकडो कामगारांच्या मेहनतीने तयार झालेले मीठ पावसाळ्यानंतर विक्रीसाठी मोठ्या राशींमध्ये प्लास्टिक आच्छादनाखाली साठवून ठेवण्यात आले होते.

मात्र, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मिठशेतीचे बांध उध्वस्त झाले. त्यामुळे साठवून ठेवलेल्या हजारो गोण्या मीठ पावसात भिजले. वर्षभराच्या परिश्रमावर पाणी फिरल्याने संस्थेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

याचबरोबर, कल्पेश पाटील यांच्या मत्स्यव्यवसायालाही मोठे नुकसान सहन करावे लागले. मुसळधार पावसामुळे मत्स्यतलावातील मासे वाहून गेल्याने त्यांच्यासमोर आणखी आर्थिक संकट उभे राहिले आहे.

दरम्यान, सद्गुरू कृपा सहकारी भात खरेदी केंद्रात शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेला मोठ्या प्रमाणावरील भातही पावसाच्या पाण्यात भिजल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी आणि संस्था या दोघांनाही मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संस्थेचे संचालक कल्पेश पाटील यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT