Kokan Heatwave Alert
रायगड : भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा प्रादेशिक केंद्राने कोकणातील जिल्ह्यांसाठी पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, उत्तर कोकणात कडाक्याच्या उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. १० आणि ११ मार्च रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर, ठाणे आणि मुंबई: या तिन्ही जिल्ह्यांसाठी आज (दि. १०) 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. येथे काही ठिकाणी 'तीव्र उष्णतेची लाट' येण्याची दाट शक्यता आहे. तर उद्या ११ मार्च रोजी येथे उष्ण व दमट हवामान राहील.
रायगड: रायगड जिल्ह्यासाठी आज 'यलो अलर्ट' देण्यात आला असून, जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात उष्णतेची लाट जाणवेल. पालघर-ठाण्याप्रमाणेच येथेही ११ मार्च रोजी हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग: दक्षिण कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मात्र पुढील पाचही दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून, येथे उष्णतेच्या लाटेचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये १२ मार्चपासून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांतील वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी आणि घराबाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी उष्माघातापासून वाचण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.