पुढारी वृत्तसेवा
कडुलिंबाची पाने सदाहरित आणि सदापर्णी आहेत. त्याची पाने, फुले, खोड हे सर्व घटक औषधाच्या द़ृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणूनच आयुर्वेद आणि पारंपारिक भारतीय औषधांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
अनेक रोग दूर ठेवण्याचे गुण कडुलिंबात आहेत. कडुलिंबाची पाने ही जंतुनाशक असल्याने गुढीवर देखील लावतात.
कफ, ताप, उष्णता, पित्तनाशक असे अनेक गुण कडुलिंबामध्ये समाविष्ट असतात. वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे कडुलिंबाचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो.
यामुळे खोकला बरा होतो आणि आरोग्याला नवसंजीवनीही मिळते. केस व त्वचेसाठीही कडुलिंब गुणकारी असतो.
तोंडाला येणारी दुर्गंधी, दात किडणे, हिरड्यांचे सुजणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्याचा उपयोग केला जातो.
कडुलिंबाच्या कडवटपणामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात राहते; पण मधुमेहींना कडुलिंबाच्या पाल्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्यामुळे बरीच मदत मिळते.
हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा. गुढीपाडव्यादिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची प्रथा आहे.