Raigad Tourism Decline Pudhari
रायगड

Raigad Tourism Decline: किल्ले रायगडावर उन्हाच्या तडाख्याने पर्यटकांची घट

रोपवेची वेळ बदलाची मागणी जोरात; पर्यटन व्यवसाय थंडावला

पुढारी वृत्तसेवा

रमेश कांबळे

अलिबाग: ऐतिहासिक रायगड किल्ला येथे यंदाच्या उन्हाळ्यात पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात सकाळपासूनच जाणवणाऱ्या तीव्र उष्णतेमुळे अनेक पर्यटकांनी रायगडाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. शिवप्रेमींची उपस्थिती काही प्रमाणात कायम असली तरी सर्वसामान्य पर्यटक, कुटुंबीय आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या कमी झाल्याने स्थानिक पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी उन्हाळ्याच्या दिवसांत रोपवे सेवा सकाळी 6 वाजता सुरू करावी, तसेच महादरवाजाही लवकर उघडावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. रायगडाची दुर्गमता आणि कोकणातील वाढते तापमान लक्षात घेता हा निर्णय आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. काहींच्या मते, पुरातत्त्व विभागाचे नियम असले तरी उन्हाळी परिस्थिती लक्षात घेऊन त्यात तात्पुरती शिथिलता देणे गरजेचे आहे.

पर्यटकांची संख्या घटल्याने स्थानिक हॉटेल व्यवसाय, खानावळी, लहान दुकाने आणि वाहन व्यावसायिक यांनाही आर्थिक फटका बसत आहे. शनिवार आणि रविवारी रायगड परिसरात होणारी वाहतूक कोंडी, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि वाहन अडवून ठेवण्याच्या तक्रारींमुळे अनेक पर्यटक नाराज होत असल्याचे चित्र आहे. दूरवरून येणाऱ्या शिवभक्तांनाही या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

पावसाळ्यात रायगडावर पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत असली तरी सध्या मात्र कडक उन्हामुळे रायगडावरील पर्यटन व्यवसाय काहीसा थंडावल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे पर्यटकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने रोपवे वेळ, पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गड चढताना होते दमछाक

विशेषतः रायगड रोपवे सकाळी 8 वाजता सुरू होत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. रोपवे सुरू झाल्यानंतर तिकीट प्रक्रिया, फॉर्म भरणे आणि रांगेत उभे राहणे यामध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे पर्यटक गडावर पोहोचेपर्यंत सकाळचे 9 वाजून जातात. त्या वेळेपर्यंत उन्हाचा तडाखा अधिक वाढलेला असतो. सकाळीच टळटळीत ऊन पडत असल्याने गड चढताना पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT