Gold price hike India Pudhari
रायगड

Gold price hike India: सोने-चांदीच्या दरांनी गाठला उच्चांक; लग्नसराईवर आर्थिक संकट

सोनं प्रति तोळा 1.57 लाखांवर, चांदी 2.67 लाखांच्या उंबरठ्यावर; मध्यमवर्गीयांचा बजेट कोलमडला

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रमेश कांबळे

सोने आणि चांदीच्या दराने पुन्हा एकदा नवा विक्रम केला आहे. सोन्याची किंमत प्रति तोळा 1 लाख 57 हजार रुपये तर चांदीची किंमत प्रति किलो 2 लाख 67 हजार रुपयांच्या जवळपास आहे. सोने आणि चांदीच्या दरात गेल्या वर्षांपासून सुरू असलेली दरवाढ ही सराफ व्यापाऱ्यांना आणि सामान्य ग्राहकांसाठी चिंतेची बाब बनली आहे.

लग्न सराई, सण-उत्सव आणि कोणत्याही शुभ कार्यासाठी सोने-चांदी खरेदी करणे ही भारतीयांची परंपरा आहे. पण अचानक दिवसागणिक होणारी दरवाढ ही सराफ बाजाराचा समतोल बिघडवणारी आहे. नोव्हेंबर ते जून हे महिने भारतीय दिनदर्शिकेनुसार लग्नसराईसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. याच काळात सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी सामान्य ग्राहक बाजारात येतात. लग्नासारख्या शुभ कार्यासाठी साधारण प्रत्येक ग्राहकाची क्षमता ही 3 ते 5 तोळे सोने खरेदी करण्याची असते. पण अचानक झालेल्या भाववाढीमुळे ग्राहकांची ही क्रयशक्ती घटल्याचे सराफ व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

सोन्या चांदीची खरेदी पकडून लग्नाचे बजेट हे 5 ते 7 लाख असते. 3 ते 5 तोळे सोने, एखादे चांगले मंगल कार्यालय, पंचपक्वानाचं जेवण, त्यातल्या त्यात उंची कपडे आणि थोडासा डामडौल असे लग्नाचे स्वरूप असते. सोन्याच्या किमती वाढल्यामुळे हेच बजेट पूर्णपणे कोसळले आहे. लग्नाचे संपूर्ण बजेट हे एकट्या सोन्याच्या दागिन्यांसाठी लागत असल्याची खंत लोकांकडून व्यक्त केली जात आहे. वाढलेल्या किमतींमुळे मध्यमवर्गीयांच्या बजेटबाहेर सोने गेले आहे. यामुळे दागिन्यांच्या विक्रीत मोठी घट झाली असून ग्राहक आता केवळ लग्नसराईसाठी आवश्यक तेवढेच सोने खरेदी करत आहेत. भारतीय लग्नकार्यात सोन्याची चेन, मंगळसूत्र, अंगठी आणि बांगड्या. तर चांदीच्या दागिन्यांमध्ये जोडवी आणि पैंजण या गोष्टी अनिवार्य मानल्या जातात. परंतु, सध्याच्या वाढत्या दरांमुळे ही खरेदी आता आवाक्याच्या बाहेर गेली आहे.

सर्वसामान्यांसाठी सोने दरवाढ चिंतेचा विषय

सध्याच्या काळात ‌‘लग्न‌’ हा केवळ दोन जीवांचा किंवा कुटुंबांचा संगम राहिला नसून, तो एक अतिखर्चिक इव्हेंट बनला आहे. मध्यमवर्गीय आणि शेतकरी कुटुंबांसाठी तर लग्नाचा खर्च पेलणे म्हणजे आयुष्यभराची कमाई एका दिवसात खर्च करण्यासारखे झाले आहे. अलीकडच्या काळात लग्नाचे स्वरूप इतके भव्य झाले आहे की, सामान्य माणसासाठी ते एक मोठे आर्थिक संकट बनत चालले आहे. हल्ली प्री-वेडिंग शूट, हळदीचा इव्हेंट, संगीत सोहळा आणि एन्ट्रीसाठी होणारी रोषणाई यावर वारेमाप खर्च केला जातो. लोक काय म्हणतील? आणि त्यांच्या मुलाच्या लग्नापेक्षा आपल्या मुलीचं लग्न जास्त थाटात झालं पाहिजे, ही चढाओढ सामान्य माणसाला कर्जबाजारी करत आहे. अशा परिस्थितीत दागिन्यांचा खर्चही वाढल्याने सामान्य कुटुंबातील लग्नसोहळ्यांचा खर्च 12 ते 15 लाखांवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला सोने चांदीचे वाढते भाव आणि मुलांची लग्नकार्ये हा अनेक कुटुंबांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT