अलिबाग: लगीन सराईचा काळ सुरु असला तरी सोने खरेदीला म्हणावा तसा प्रतिसाद रायगडात दिसत नाही. शिवाय गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात चढउतार होतअसले तरी ग्राहकांकडूनअपेक्षित असा प्रतिसाद लाभत नसल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.
आखाती युद्धाचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर होतअसलेल्या परिणामाचा मोठा फटका भारतीय सोने बाजारावर पडत असल्याचे जाणवू लागलेले आहे.गेल्या दोन,तीन महिन्यांपासून सोने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.24 कॅरेटचा दर पावणे दोन लाखांच्या आसपास गेला होता.तर चांदीने अडीच लाखांचा पल्लाही गाठला.या दरवाढीमुळे सर्वसामान्य हा सोने,चांदी खरेदीपासून दूरच गेल्याचे जाणवू लागले आहे.
लग्नासाठी सोने खरेदी होणे अपेक्षित आहे.मात्र वाढलेल्या दराने सर्वसामान्य ग्राहक आवश्यक तेवढीच सोने खरेदी करताना दिसत आहे.या दरवाढीचा फटका वधु,वर या दोन्ही पक्षांना बसत आहे.यामुळे समन्वयातूनच आवश्यकअसलेले सोने खरेदी केली जात असल्याचे सोने व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.
लग्नासाठी मुलीसाठी दोन, अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र घ्यायचे झाले तरी त्याचाखर्च किमान तीन लाखांच्या आसपास जातोय.शिवाय अन्य सुवर्णलंकार खरेदी करताना वधुपित्याची दमछाक होऊ लागल्याचे जाणवतआहे.याशिवाय लग्नसराईचा अन्य खर्च वेगळाच.सोने दरवाढीबरोबरच अन्य वस्तुही महागलेल्या असल्याने त्याची बसणारी झळ वेगळीच असते.
दर आणखी वाढणार
सोने व्यापारी वर्गातून दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आखाती युद्धाचे आंतरराष्ट्रीय व्यापारावर होतअसलेल्या परिणामामुळे ही दरवाढ होत राहील,असा अंदाज व्यक्त केला जातआहे.जर अशीच दरवाढ होत राहिली तर सर्वसामान्य ग्राहक सोने खरेदीपासून चार हात लांबच राहील,असे बोलले जाते.
नुकतेच आर्थिक वर्षही सुरू झालेले आहे.ज्यांना दरवर्षी सोने खरेदीत गुंतवणूक करायची असते त्यांनीही अपेक्षितअशी गुंतवणूक केली नसल्याने व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पेढ्यांनीही अनेक सवलती जाहीर केलेल्या आहेत.
दोन महिन्यात लग्नाचे मुहूर्त
सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. एप्रिल महिन्यात 15,20, 21,25, 26,27,28,29 या तारखांना लग्न मुहूर्त आहेत.तर मे महिन्यात1,3,5, 6,7,8,13,14 या तारखा लग्न मुहुर्तासाठी सुयोग्य आहेत. याचाच अर्थ येत्या दोन महिन्यात किमान 15 दिवस तरी लग्न मुहूर्त आहेत. यामुळे लग्नसराई जोरात होणार हे नक्की.