Gharapuri water management system pudhari photo
रायगड

Raigad News : घारापुरीत प्रगत जलव्यवस्थापनाचा उलगडा

टी आकाराच्या भव्य जलकुंडाचा शोध; पुरातत्व विभागाचे उत्खनन

पुढारी वृत्तसेवा

उरण ः राजकुमार भगत

जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी बेटावर सुरू असलेल्या पुरातत्व विभागाच्या उत्खननातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बेटावर सुमारे 1500 वर्षांपूर्वीचे, दगड आणि विटांनी बांधलेले एक भव्य टी आकाराचे जलकुंड सापडले असून, यामुळे प्राचीन काळातील प्रगत अभियांत्रिकी आणि जलव्यवस्थापन प्रणालीवर प्रकाश पडला आहे. हे कुंड बेटावरील रहिवाशांना वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

घारापुरी बेट हे प्रामुख्याने पाषाणात कोरलेल्या लेण्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण च्या पथकाला मोराबंदर परिसरात सापडलेला हा जलाशय खडकात कोरलेला नसून तो दगड आणि विटांच्या साहाय्याने बांधलेला आहे. अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. अभिजित आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन सुरू आहे.

या उत्खननात केवळ जलकुंडच नव्हे, तर घारापुरी बेटाचे प्राचीन जागतिक व्यापाराशी असलेले संबंधही स्पष्ट झाले आहेत. या उत्खननात काही महत्वपूर्ण वस्तूंचा शोध लागला आहे.1. मेसोपोटेमियातील टॉर्पेडो आणि भूमध्य सागरी प्रदेशातील अँफोरा जारचे 3000 हून अधिक खापरांचे तुकडे सापडले आहेत. या भांड्यांचा वापर वाईन, तेल आणि फिश सॉसच्या जागतिक वाहतुकीसाठी केला जात असे. 2. उत्खननात तांब्याची 6 आणि शिशाची 5 अशी एकूण 11 नाणी सापडली आहेत.

त्यापैकी दोन नाणी कलचुरी राजवंशाच्या कृष्णराजाची असल्याचे पुणे येथील डेक्कन कॉलेजचे प्रा. अभिजित दांडेकर यांनी स्पष्ट केले. या नाण्यांवर बसलेल्या बैलाचे चित्र आणि श्री कृष्णराज असा मजकूर आहे.

हे बेट लहान आणि भरती-ओहोटीने प्रभावित असूनही येथे लेण्यांची निर्मिती का झाली, याचा उलगडाही या संशोधनातून होत आहे. पश्चिम भारतातील व्यापारी जाळ्यांमध्ये ही गुहा स्थळे केवळ धार्मिक केंद्रे नसून महत्त्वाची संस्थात्मक केंद्रे होती.

1854 मध्ये व्यापारी समुदायाचे सदस्य ठाकर करमसी रणमल लोहाना यांनी शेठ बंदर येथे बांधलेल्या पायऱ्यांवरूनही या बेटाचे व्यापारी समुदायाशी असलेले निरंतर नाते स्पष्ट होते. पुरातत्व विभागाच्या या शोधामुळे घारापुरी बेटाच्या इतिहासात आता एका नव्या प्रकरणाची भर पडली असून, प्राचीन भारतीयांच्या स्थानिक जल व्यवस्थापनाच्या कौशल्याने अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जलकुंभाच्या रचनेची वैशिष्ट्ये

हे जलकुंड आयताकृती असून एका बाजूला काटकोनी पायऱ्यांच्या जोडणीमुळे त्याला टी आकार प्राप्त झाला आहे. याची लांबी सुमारे 14.7 मीटर असून रुंदी 10.8 मीटर आहे. आतापर्यंत 5 मीटर खोलीपर्यंत उत्खनन झाले असून, त्यात 20 पायऱ्या उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे, या पायऱ्यांसाठी वापरलेले दगड बेटावरील नसून ते बाहेरून आणलेले आहेत.

“बेटावर पावसाचे प्रमाण अधिक असले तरी खडकाळ जमिनीमुळे पाणी जमिनीत मुरत नाही आणि समुद्रात वाहून जाते. अशा स्थितीत पावसाळ्यानंतरच्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी हे कुंड अतिशय नियोजित पद्धतीने बांधण्यात आले आहे.“ गुजरात आणि राजस्थानमधील स्टेपवेल्सशी (पायऱ्यांची विहीर) या रचनेचे साधर्म्य आढळते.
डॉ. अभिजित आंबेकर, पुरातत्वशास्त्रज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT