पोलादपूर: तालुक्यातील रानवडीच्या मोरीवरून घागरकोंडच्या जलप्रपाताकडे आणि तेथील झुलत्या पुलाकडे पूर्वी जाता येते होते. २०२१ च्या नैसर्गिक आपत्ती लोहरज्जू बाधित झाला आणि इतिहास जमा झाला.
त्यामुळे येथील येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही कमी झाली असा पूल पुन्हा उभारणीची शक्यता दिसून येत नसल्याने भविष्यात इथे लोहरज्जू झुलता पूल होता या असे म्हणावे लागणार आहे. पर्यटन वाढीसाठी झुलत्या पुलाची पुन्हा उभारणी आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीकोनातून तिन्ही हंगामामध्ये कोकणात पर्यटक लाखोंच्या घरात येत आहे. महाड पोलादपुरातील ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी व निर्सगाचे लेन अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक येत असून, प्रमुख पर्यटन स्थळाकडे शासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे सोई-सुविधांची वानवा दिसून येत आहे.
मुख्य पर्यटनस्थळी नागरिकांच्या सुविधेसह आरोग्य यंत्रणा सक्षम केल्यास पर्यटनासह ग्रामीण भागाचा कायापालट होईल अशी अशा पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील पावसाळी पर्यटन बहरले असून धबधबे सह येथील डोंगर हिरवाईने सजल्याचे दिसून येत आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगातून निसर्गाच्या सौंदर्याची उधळण पाहण्यासाठी व हिरवळीने आच्छादन घातलेल्या व ढगाने पांघरलेल्या डोंगर-दऱ्यातून वाहणारी शुभ्र धबधबे वर्षा सहलीसाठी पर्यटकांना साद घालत आहे.
मात्र या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने गेल्या काही वर्षात अनुचित प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. या मुळे अनेक पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली आहे असे असले तरी जे धबधबे आहेत त्या ठिकाणी होणारी गर्दी लक्ष्यात घेता त्या ठिकाणी उपाययोजना राबविणे गरजेचे बनले आहे.
महाड तालुक्यातील मांडले, नादगाव, कोंझर, केंबुर्ली येथील धबधब्यांसह अध्यात्मिक व पशु पक्षाच्या विविध अभ्यासासाठी असलेले शिवथरघळ, ऐतिहासिक वाळण कोंडी याचप्रमाणे गरम पाण्याचे झरे सव, आदींसह पोलादपूर तालुक्यातीलएस.टी.स्थानकालगतची कवींद्र परमानंदांची ऐतिहासिक समाधी आणि तेथील आधुनिक दूर्गसृष्टी पाहून वर्षासहलीला सुरूवात करता येते.
शहरातील स्मशानभूमी लगतची रेव्हरंड डोनाल्ड मिशेलचे इष्टिकाचितीच्या आकाराचे थडगे, महाबळेश्वर रस्त्यावरील चोळई नदीवरील पुलावरून सावित्री आणि चोळई नदीच्या संगमाचे दृश्य, तेथील दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलचा निसर्गरम्य परिसर, हिलस्टेशन कुडपण येथील भिमाची काठी या सुळक्यापर्यंत तसेच कुडपणच्या थंड पाण्याच्या धबधब्यापर्यंत जाता येते. रानवडीच्या मोरीवरून घागरकोंडच्या जलप्रपाताकडे आणि तेथील झुलत्या पुलाकडे या पूर्वी जाता येते होते.
या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी जिल्हा परिषदेचे रस्ते व्यवस्थित करण्याची गरज आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहामध्ये खानसमा आणि अन्य सुविधा होण्याची यासाठी आवश्यकता आहे.
तालुक्यातील हॉटेल व्यवसाय, पारंपरिक लोककला, गोडया पाण्यातील मासेमारी, वनौषधी, ग्रामपर्यटनसंस्कृती, कृषीपर्यटन आदींना चालना देण्यासाठी मार्गदर्शन करणारी पर्यटनतज्ज्ञांची पथके येथे सामोरे जाण्यासाठी सरकारतर्फे पाठवून प्रबोधन करण्यात यावेत.तरच तालुक्यातील पर्यटन वाढीस लागून रोजगारात वाढ होऊन विकास साधता येणार आहे.
तात्पुरत्या निवारा शेडची मागणी
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या महिला वर्गाला कपडे बदलण्यासाठी विश्रामगृह किंवा खोल्या नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे. पोलादपूर तालुक्यातील चांदके- खोपडचा धबधबा (मोरझोत) येणाऱ्या महिलांसाठी जिल्हा परिषदचे विश्रामगृह उपयुक्त ठरत आहेत.
त्याच धरतीवर महत्वाच्या पर्यटनस्थळी पावसाळ्याच्या हंगामात तात्पुरते निवारा शेड उभारल्यास पर्यटकांचा ओघ वाढून स्थानिकांच्या रोजगारात वाढ होईल. मात्र यासाठी ग्रामीण पर्यटकांच्या माध्यमातून व स्थानिक पर्यटन, विविध संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करणे क्रमप्राप्त बनले आहे.