Murud Garambi Dam Overflow Pudhari
रायगड

Murud Garambi Dam Overflow: नवाबकालीन गारंबी,खरआंबोली धरणे भरली

पर्यटकांची चंगळ, मात्र प्रशासनाकडून सावधगिरीचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

रायगड: सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुरुड परिसरातील नवाबकालीन गारंबी आणि नव्याने बांधलेले खरआंबोली धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून धरण भरण्याची चातकासारखी वाट पाहणाऱ्या पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणी ठरली असून, रविवारी येथे पर्यटकांची मोठी चंगळ होणार असल्याचे चित्र आहे.

निसर्गरम्य सातवतकडा धबधबाही मोठ्या प्रमाणात वाहू लागला आहे, मात्र तिथली वाट बिकट असल्याने पर्यटक गारंबी आणि खारआंबोली धरणांकडेच अधिक पसंती देत आहेत.

पर्यटकांनी मुख्य धरणाच्या धोकादायक पात्रात न उतरता, खाली वाहणाऱ्या छोट्या धबधब्यांमध्ये पावसाचा आनंद घ्यावा आणि संभाव्य अपघात टाळावेत,असे आवाहन स्थानिक पोलिसांनी केले आहे.

गारंबी धरणाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जंजिरा संस्थानाचा पुरोगामी विकास करणारे नवाब सर सिद्दी अहमदखान यांनी ब्रिटनच्या व्हिक्टोरिया राणीच्या भारत भेटीची आठवण म्हणून गारंबीच्या जंगलातील या धरणास "व्हिक्टोरिया ज्युबीली वॉटर वर्क्स" असे नाव दिले होते.

विपुल वनसंपत्ती आणि नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवून बांधलेले हे धरण आज 'गारंबी धरण' म्हणून प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, मुरुड शहराला होणारा पिण्याचा पाणीपुरवठा याच ठिकाणाहून पूर्णपणे नैसर्गिक प्रवाहाच्या वेगाचा (ग्रॅव्हिटी) वापर करून केला जातो.

पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहात डुंबण्यासाठी आणि वनभोजनासाठी हे ठिकाण पर्यटकांचे आवडते केंद्र बनले आहे.

दरीत उतरणारी जांभ्या दगडातील पायवाट, चहूबाजूला असलेली प्रचंड वृक्षराजी, मोठे खडक, वाहत्या पाण्याचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट पर्यटकांना खिळवून ठेवतो. शहराचा मुख्य पाणीस्रोत असल्याने, पाण्याचा मूळ प्रवाह दूषित न करता निसर्गाचा आनंद घेण्याचे आवाहनही सुज्ञ नागरिकांकडून केले जात आहे.

मुरुड-गारंबी मार्गे रोहा हा नवा रस्ता झाल्यामुळे पुणे, कोल्हापूर परिसरातील पर्यटक या वळणदार जंगल मार्गाने प्रवास करणे पसंत करत आहेत. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो. सध्याच्या पर्यटकांना पावसात भिजण्याचा आणि पोहण्याचा आनंद घेण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते.

जर गारंबी आणि खरआंबोली धरणांचा योग्य विकास झाला, तर मुरुड शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात.नव्याने बांधण्यात आलेल्या खारआंबोली धरणाची पाणी साठवण क्षमता मोठी असल्याने मुरुड शहराला भविष्यात कधीही पाणीटंचाई भासणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT