Private Travels Fare Hike Pudhari
रायगड

Private Travels Fare Hike: भयंकर लूट! कोकणवासीयांवर खासगी ‘ट्रॅव्हल्स’चा ‘दरोडा’; ८०० रुपयांचे तिकीट थेट ५ हजारांवर

गणेशभक्तांमध्ये प्रचंड संताप

पुढारी वृत्तसेवा

रायगड: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशावर यंदा खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी अक्षरशः दरोडा घातला आहे. मुंबई-पुण्याहून कोकणात जाणाऱ्या खासगी बसचे नेहमीचे ८०० ते १ हजार रुपयांचे तिकीट थेट चार ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने गणरायाच्या दर्शनासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

सणाच्या गर्दीचा गैरफायदा घेत सुरू असलेल्या या मनमानी भाडेवाढीमुळे कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रशासकीय नियमांनुसार खासगी ट्रॅव्हल्सचालकांना एसटी महामंडळाच्या मूळ तिकीट दरापेक्षा कमाल दीडपट भाडे आकारण्याची परवानगी असल्याचे सांगितले जाते. मात्र गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेत अनेक चालकांकडून या मर्यादेची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे.

प्रवाशांची मागणी वाढली की तिकिटांचे दर मनमानी पद्धतीने वाढविले जात असल्याने सणाचा आनंद लुटण्‍यासाठी चाकरमान्‍यांना तोंड दाबून बुक्‍क्याचा मार सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणे ही कोकणवासीयांची भावना आहे.

मात्र, एसटी आणि कोकण रेल्वेची तिकिटे फुल्ल झाल्यानंतर खासगी बसेसचा आधार घ्यावा लागतो आणि त्यासाठी अवाच्या सव्वा पैसे मोजावे लागतात. ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. तरीही परिवहन विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही, हे कोकणवासीयांचे मोठे दुर्दैव आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दत्ता पारकर या कोकणवासीयाने व्यक्त केली.

प्रशासनाचे नियंत्रण नेमके कुठे?

गावी जाण्याची प्रत्येकाचीच घाई, रेल्वे आणि एसटीची अपुरी उपलब्धता आणि वाढलेली गर्दी यामुळे खासगी बसचालकांचे फावले आहे. मात्र, नियम धाब्यावर बसवून हजारो रुपये उकळणाऱ्या ट्रॅव्हल्सचालकांवर कारवाई कोण करणार? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

दरवर्षी गणेशोत्सव आणि होळीच्या काळात अशाच प्रकारे तिकीटदर वाढत असतानाही परिवहन विभागाकडून ठोस उपाययोजना का केली जात नाही, असा प्रश्न कोकणवासीय विचारत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT