रमेश कांबळे
अलिबाग : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला उन-पावसाचा खेळ त्याचप्रमाणे गणेशोत्सवातील धामधूम यामुळे आता सर्दी- तापासारख्या डेंग्यू साथीच्या रोगांचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे साचलेले पाणी, कचरा यामुळे साथीचे आजार बळावले आहेत. या आजारांवर उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात मोठया संख्येने रुग्ण येत असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालय हाउसफुल्ल झाले आहे. (Latest Raigad News)
पावसाळा सुरू झाल्यानंतर डेंग्यु, मलेरिया, सर्दी-ताप, खोकल्यासारखे साथीचे आजार बळावतात. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आधीच औषधांचा पुरेसा साठा, अतिरक्त बेडची व्यवस्था करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणेशोत्सवात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्याचप्रमाणे कचर्याचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यु, ताप-सर्दीसारखे आजार बळावले आहेत. साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. वारंवार ताप येणे, सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या, मळमळ इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने उपचार करावे, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शीतल जोशी यांनी केले आहे.
जून ते आजपर्यंत एकूण 37 डेंग्युचे रुग्ण आढळले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. तर लेप्टोचे एकूण 14 रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून या सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. लेप्टोच्या 14 रुग्णांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. तर सर्दी- तापाचे एकूण 349 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. यातील लहान मुलांची संख्या तब्बल 155 एवढी आहे.
पावसाळी वातावरणात ताप, सर्दी आणि खोकल्यासह इतर संसर्गजन्य आजारांची लागण अनेकांना होते. यातच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना तापाचा प्रादुर्भाव तत्काळ होतो. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. साथीच्या आजारांमध्ये आवश्यक काळजी घेत उपचार घ्यावे, आजार अंगावर काढू नये. परिसरातील अस्वच्छता हे प्रामुख्याने आजारांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरतात. घराप्रमाणे इतर परिसर स्वच्छ ठेवल्यास अशा आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.
सध्या रुग्णालयात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. आरोग्य विभाग सतर्क असून, उपचारासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. रुग्णालयात औषधांचाही पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. साथीच्या आजारांचा संसर्ग हा सहसा पाण्यातून होतो. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून पिणे, पाणी साठवून ठेवण्याच्या जागा वेळोवेळी स्वच्छ करणे अशी खबरदारी आपण घ्यायला हवी.डॉ. शितल जोशी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग.