अलिबाग (रायगड) : सुवर्णा दिवेकर
अलिबाग तालुक्यातील घरात आळी येथे १९८९ साली स्थापन झालेले आदर्श मित्र मंडळ यंदा आपल्या वैभवशाली प्रवासाचे ३७वे वर्ष साजरे करत आहे. स्थापनेपासूनच समाजाभिमुख कार्य, जनजागृतीपर देखावे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा मंडळाने जोपासली असून यामुळे मंडळाने परिसरात विशेष ओळख निर्माण केली आहे.
यावर्षी मंडळाने 'ऑपरेशन सिंदूर' हा समाजप्रबोधनपर देखावा सादर केला आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिकमुक्तीचा संदेश, शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, तसेच तुळशीसह उपयुक्त रोपांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व
अधोरेखित करण्यात आले. याशिवाय पाळणाघरांना मदत करून गरजूंपर्यंत हातभार लावण्यात आला आहे. मंडळाने यापूर्वी 'भ्रूणहत्या' या संवेदनशील विषयावर मांडलेला देखावा प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यावेळी मंडळाने एक आगळीवेगळी सामाजिक जाणीव जपत फक्त मुली असलेल्या पालकांचा सार्वजनिक सत्कार करून समाजाला सकारात्मक संदेश दिला होता.
फक्त गणेशोत्सवापुरतेच नव्हे तर वर्षभर मंडळाचे विविध उपक्रम सुरू असतात. यामध्ये वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिरे, 'आय डोनेट' शिबिर अशा उपक्रमांचा समावेश आहे. याशिवाय पोलीस वेल्फेअर फंडाला २५ हजार रुपयांची मदत करून मंडळाने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. मंडळाच्या स्थापनेपासूनच समाजाभिमुख कार्य, जनजागृतीपर देखावे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा मंडळाने जोपासली आहे.
गणेशोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून आदर्श मित्र मंडळाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मंडळाच्या प्रगतीमध्ये माननीय प्रशांत शेठ नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून, सर्व वर्गणीदारांच्या योगदानामुळेच हे कार्य यशस्वी होत असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.