

वाडा (ठाणे) : गणेशोत्सवात गणेश मूर्तीसोबत देखाव्यांचे तितकेच महत्व असून अलीकडे या भव्य देखाव्यांची जागा गायब झाल्याचे पहायला मिळते. कंचाड गावातील एका कलाकाराने मात्र पंढरपूर येथील विठ्ठलाचे भव्य मंदिराचा गाभारा उभारल्याने वातावरण भक्तिमय झाले आहे. मंदिराचा देखावा, मांडणी व बारकावे थक्क करणारे असून तालुक्यातून मोठ्यासंख्येने लोकं हा देखावा बघायला येत आहेत.
डोंगर, रथ, झाडेझुडपे यांसह विविध विषयांच्या बोधकथा सांगणारे देखावे गणेशोत्सवात रंगत आणीत असून अलीकडे रेडीमेड डेकोरेशनमुळे पारंपरिक देखावे लुप्त होऊ लागले आहेत. तरुणाई वेळ-खाऊ कामांमध्ये गुंतायला तयार नसल्याने कलागुणांची होणारी उधळण दुर्मिळ बनत चालली आहे. कंचाड गावातील रोहित पागधरे या तरुणीने मात्र अनेक वर्षांपासून ही परंपरा जोपासली असून त्याने उभारलेले विठ्ठलमंदिर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्याची प्रतिकृती त्याने उभारली असून १८ फूट रुंद, २० फूट लांब व १० फूट उंचीची ही भव्य प्रतिकृती घरगुती गणेशोत्सवात उभारणे म्हणजे कौतुकास्पद आहे. रोहितने याआधी केदारनाथ, अयोध्येचे राममंदिर, तिरुपती बालाजी अशा अनेक विषयांवर सुरेख देखावे उभारले असून खअनेक पुरस्कार देखील पटकावले असून केवळ हौस म्हणून त्याने बनविलेले देखावे तरुण कलाकारांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत.