महाड खाडीपट्टयामध्ये मूलभूत समस्यांचा विळखा आणखीनच घट्ट होत चालला आहे Pudhari News Network
रायगड

Ganesh Chaturthi : असुविधांमुळे गणेशोत्सवामध्ये समस्यांचे विघ्न

खाडीपट्टयात रस्ते, पाणी, वीज, मोबाईल नेटवर्कची ऐशीतैशी; नागरिकांमध्ये प्रचंड संताप

पुढारी वृत्तसेवा

खाडीपट्टा (रायगड) : रघुनाथ भागवत

महाड खाडीपट्टयामध्ये मूलभूत गरजांची मोठ्या प्रमाणात असुविधा असून या असुविधांविरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीही वाली नसल्याचे येथील नागरिकांनी सवाल उपस्थित करून या समस्यांचा विळखा आणखीनच घट्ट होत चालला आहे. विज, पाणी, रस्ता त्याचबरोबर संपर्कासाठी महत्वाचे मोबाईल नेटवर्क सुविधांचा अभाव असून नागरिक असुविधांमुळे अक्षरशः कंटाळले आहेत. यामुळे गणेशोत्सवामध्ये समस्यांचे विघ्न अडथळा आणत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या खैरे धरणाच्या पाईप लाईनमध्ये बिघाड, पाईप लिकेज अथवा मोटार जळण्याच्या होणाऱ्या वारंवार घटना आता काहीशा दूर झाल्या असल्या, तरी कित्येक नागरिकांना आजही या योजनेचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी चिंताजनक आहेत. बीएसएनएल मोबाईल नेटवर्क अगदीच काळबाह्य होत चालल्याचे खाडीपट्टयातील नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे, इतर कंपन्यांचे नेटवर्क देखील कमकुवत असून काही ठराविक ठिकाणीच ते उपलब्ध होत असल्याचे पाहायला मिळत असून त्यामुळेच कित्येक मुंबईकर मंडळी गावाच्या बाहेर हायवेवर ठराविक ठिकाणी जाऊन नेटवर्क चा लाभ घेताना दिसत कित्येक आहेत.

राष्ट्रीय महामार्गाची ठिकठिकाणी झालेली दुरवस्था त्याचबरोबर येथील ग्रामीण भागातील गावागावांमधील अंतर्गत रस्त्यांची देखील प्रचंड चाळण झाली असून जल जीवन मिशनच्या कामांमु‌ळे कित्येक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेल्या पाईपलाईन कामामुळे निकृष्ट दर्जाचे खड्डे भरून रस्त्याचे बेहाल केले आहे. ठिकठिकाणी अंतर्गत रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून वाहन जाण्याबरोबरच नागरिकांना चालणे देखील जिकरीचे झाले आहे. दुसरीकडे विजेचा लपंडाव सतत सुरू असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वारंवार विजेच्या लपंडावामुळे मुंबईकर ग्रामस्थ मंडळींचे हाल झाले आहेत.

पावसाची संततधार सुरू असताना देखील गर्मीन नागरिक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी आयोजित केलेल्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांना विजेच्या लपंडावामुळे विघ्न निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत असून त्यामुळे महावितरणच्या नावाने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

विभागाला वालीच उरला नाही

भेडसावणाऱ्या समस्यांविरुद्ध कोणीही आवाज उठवायला तयार नसून खाडीपट्टयाला कोणी वालीच उरला नसल्याचे नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, गावागावातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे वाजलेले तिनतेरा आणि अत्यंत महत्त्वाची असणारी मोबाईल सेवा देखील सत्वर कोलमडलेली असून या असुविधांबद्दल कोणीही लोकप्रतिनिधी आवाज उठवण्यास समर्थ नसल्याचे नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT