मुरुड जंजिरा (रायगड) : सुधीर नाझरे
मुरुड शहर असे आहे की तेथे एकही सार्वजनिक गणपती नाही. प्रत्येक घरात गणपती स्थापना होते. शहरात 5 हजार 215 गणेशमूर्तींची स्थापना होते.
एकमेकांना दर्शनासाठी प्रत्येकाकडे जाऊन सामाजिक एकोपा राखला जातो. मुंबईचे नोकरदार गावाला 2 दिवस अगोदर येऊन सजावटीच्या कामाला लागतात. मुरुड, राजपुरी व एकदरा येथील कोळीवाडे गणपतीच्या देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. गणेश आगमनसाठी मुरुड परिसरात 8 दिवस अगोदर कामाला सुरवात होते. अतिशय उत्साहात गणेश आगमन होते. कोळीवाड्यात संपूर्ण घर पाण्याने स्वच्छ केले जाते.
मुंबईहून खास डेकोरेशनसाठी सुट्टी घेऊन गावच्या घरी घरातील मुले येतात व प्रत्यक्ष घरात नाविन्यपूर्ण चलतचित्र साकारण्यात येतो. त्यासाठी लागणारे बांबू, रंगीत पडदे, पुठे, विजेच्या मोटर व भिंती रंगवण्याचे काम करण्यासाठी कमीतकमी 8 दिवस आधी काम सुरु करावे लागते आणि म्हणून रायगडमधून खास गणपती पाहण्यासाठी मुरुडला गणेशभक्त हजारोच्या संख्येने येतात. कोळी बांधवाना मासेमारीत कितीही नुकसान झाले तरीही गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश आगमन हेदेखील वैशिष्टपूर्ण असते. अनेक गावात समुद्रापलीकडून गणपती बोटीतून वाजतगाजत घरी आणला जातो. काही ठिकाणी हिरव्यागार शेतातून खलु बाज्याच्या संगीतात गणपतीचे आगमन होते. गणपती 1 दिवस आधी आणला जातो. रात्री उशिरापर्यंत डेकोरेशनचे काम संपले की गणपती शहरात पाऊस असेल तर रिक्षात, गाडीत किंवा हातगाडीत वाजत गाजत आणला जातो.
या वर्षी सर्वत्र भारताने सोडलेले चांद्रयानाचे देखावे पाहायला मिळतात. देशात होणार्या प्रमुख घडामोडी आणि सामाजिक संदेश देणारे व रामायण, महाभारत असे पुराणिक देखावे कोळी बांधव साकारून भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याचे काम करतात.
गणेशचतुर्थी दिनी प्रात:स्नान-संध्या पूजादी नित्यविधी आटपून मूर्तीची स्थापन ब्राह्मणाला बोलून करतात. यादिवशी कोळी बांधव मासेमारी पूर्ण बंद ठेवतात. कोळीवाड्यात काही कलाकार गेली अनेक वर्ष वर्षातील राजकीय घडामोडींवर देखावे साकारतात. अनेक शिक्षक देखाव्यातून समाजाला बोध देण्याचा प्रयत्न करतात.