Sindhudurg Historical Places Pudhari
रायगड

Konkan Historical Places: गड नदीवरची गडाची गावं; गड नदीवरील किल्ल्यांची माळ : इतिहास, व्यापार आणि दुर्गवैभवाचा प्रवास

भरतगड, भगवंतगड आणि रामगडच्या साक्षीने उलगडतो सिंधुदुर्गातील प्राचीन व्यापारी मार्गाचा दुर्गम वारसा

पुढारी वृत्तसेवा

आटपाट नगर होतं

नीती मेहेंदळे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पश्चिमेला समुद्राचं सान्निध्य आणि पूर्वेला सह्याद्रीची लांबसडक रांग पसरली आहे तिच्यातून अनेक खळाळत्या नद्या प्रसवल्या आहेत. देवगड, कारली, कसाल, वाघोटण, नारिंग्रे, आचरा, घरकोंड, मोचेमाड, तेरेखोल अशा अनेक नद्यांनी सिंधुदुर्ग सुजलाम्‌‍ सुफलाम्‌‍ केलाय. यांत एक अजून महत्त्वाची नदी आहे, ती म्हणजे गड नदी. तिच्या नावातच तिचं दुर्गत्व लपलेलं आहे. नरडावेजवळ डोंगरात उगम पावलेली गड नदी अनेक वळणवाटांनी अखेर अरबी समुद्रात खाडीरूप घेत विलीन होते. एवढ्याशा प्रवासात तिच्या प्रवाहाने बरंच काही पाहिलेलं आहे. समुद्राजवळ असलेलं जुनं मालवण बंदर परदेशी मालाची उठाठेव करत असे. जवळची गड नदी तो आपल्या प्रवाहावर गलबतं, तरींनी वाहून नेत असे. म्हणजे हा व्यापारी मार्ग असला पाहिजे. याचा पुरावा म्हणून एक बंदरदेखील या नदीवर होतं.

गड नदीवरची गडाची गावं

मालोंड हे गड नदीवरचं एक गाव. गावात जुन्या बंदराच्या खुणा आजही बघायला मिळतात. व्यापार म्हटला की मालाची वाहतूक आली. नदीमार्गे चालणाऱ्या या वाहतुकीवर देखरेख करण्यासाठी किल्ले असत. तसे ते या प्रवाहावरसुद्धा आहेत. एक-दोन नव्हेत तर चांगले चार किल्ले बांधलेले दिसतात. गड नदीचे हे संरक्षक किल्लेच. समुद्राकडून गड नदीचं कालवली खाडी झालेलं पात्र धरून उलट प्रवास करू लागलं की, पहिला थांबा येतो तो मसुरे गावाजवळ. खाडीच्या उत्तरेला मर्डे गाव आहे तिथे भगवंतगड उभा आहे आणि दक्षिण बाजूला मसुरे गावात टेकडीवर भरतगड आहे.

5 ते 6 एकरवर पसरलेल्या भरतगडावर जाण्यासाठी चिरेबंदी पायऱ्या आहेत. भरतगडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग असून दोन्ही भागातील अवशेष सुस्थितीत आहेत. कालावल खाडीकाठी मोक्याच्या जागी उभ्या असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी 1670 मध्ये शिवरायांनी पाहणी केली होती म्हणे. पण, डोंगरावर पाण्याची सोय नसल्याने येथे गड बांधण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. 1680 साली वाडीकर फोंड सावंत व कोल्हापूरचे वावडेकर पंतप्रतिनिधी यांच्यात तंटा झाल्यावर फोंड सावंतांनी मसुरे गावाजवळील डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरविले. त्यासाठी प्रथम त्यांनी विहीर खणली. नंतर 1701 साली किल्ला बांधला. इंग्रजांनी हा किल्ला जिंकला, तेव्हा त्यांना गडावरील विहीर कोरडी आढळली. गडावरील तोफांच्या माऱ्यामुळे विहिरीच्या तळाला तडे जाऊन विहिरीतील पाणी नाहीसे झाले.

मसुरे गावातील तलाठी ऑफिस समोरून व मशिदीच्या बाजूने जाणारी चिरेबंदी पायऱ्यांची वाट आपल्याला 5 मिनिटात गडावर घेऊन जाते. गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे, पण बाजूचे बुरुज, तटबंदी शाबूत आहेत. गडाच्या भोवताली 20 फूट खोल व

10 फूट रुंद खंदक आहे. दाट झाडीमुळे तो झाकला गेला आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या हाताला तटबंदी ठेवून दक्षिणेकडे चालत गेल्यास तटबंदी व बुरुज लागतात. दक्षिणेकडे तटबंदीजवळ एक खोल खड्डा आहे, ते पावसाचे पाणी साठवण्यासाठी खोदलेले साचपाण्याचे तळे असावे. तटबंदीच्या कडेकडेने गडाला प्रदक्षिणा घालून उत्तर टोकाला जात येते. गडावर मधोमध उंचीवर बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याच्या चार टोकांना चार बुरुज व 10 फूट ऊंच तटबंदी आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर देवड्या आहेत. प्रवेशद्वाराजवळील बुरुजावर चढण्यासाठी जिना आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला महापुरुषाचे छोटे देऊळ आहे. देवळामागे कातळात खोदलेली खोल विहीर आहे. त्याच्या उजव्या हाताला दारू कोठार, धान्य कोठार यांचे अवशेष आहेत. दक्षिणेकडील बुरुजात चोर दरवाजा आहे. या दरवाज्याने बाहेर आल्यास आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो.

मर्डे गावात दीड एकरवर पसरलेला भगवंतगड गर्द झाडीने आच्छादलेला आहे. सावंतवाडीकर सावंत व कोल्हापूरकर छत्रपती यांच्यात वरचेवर लढाया होत असत. 1701 मध्ये सावंतांनी कालावल खाडीच्या दक्षिण काठावरील मसुरे गावात भरतगड किल्ला बांधला. त्याला शह देण्यास पंतप्रतिनिधींनी कालावल खाडीच्या उत्तर काठावरील बांदीवडे गावानजीकच्या टेकडीवर भगवंतगड किल्ला बांधला. पुढे हा किल्ला सावंतवाडीकरांच्या ताब्यात गेला. 1748 साली तुळाजी आंग्रे यांनी भगवंतगडावर हल्ला केला, पण किल्लेदाराने तो दीड वर्ष चिकाटीने लढवला. पुढे अर्थातच ब्रिटिशांनी हा किल्ला सर केला.

गडावर जाण्यास मर्डे गावाच्या शाळेच्या मागून मळलेली वाट आहे. 10 मिनिटात ती गडावर घेऊन जाते. गडाचे प्रवेशद्वार अस्तित्वात नाही. बाजूचे बुरुज व तटबंदी ढासळली आहे. गडावरील एकमेव शाबूत वास्तू म्हणजे सिद्धेश्वराचे मंदिर. चिरेबंदी बांधणीच्या या मंदिरात दगड आहे. त्याला स्थानिक लोक “सिद्धेश्वर” म्हणतात. मंदिराच्या बाजूला 4 फुटी चिरेबंदी तुळशीवृंदावन आहे. गडावर लोकांचा वावर नसल्याने दाट झाडी आहे. त्यामुळे गडावरील अवशेष पाहता येत नाहीत. तटबंदीचे तुरळक अवशेष व काही जोती गडभर पसरली आहेत. गडावरून कालावल खाडी व भरतगडाचे दृश्य दिसते.

मसुरेनंतर मालोंड बंदराच्या गावाला ओलांडून नदी रामगड गावाशी येते. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटलेल्या एका डोंगरावर रामगड किल्ला बांधला. आजही किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज शाबूत आहेत. रामगडची उभारणी शिवाजीराजांच्या काळात झाली आहे. गडाचा विशेष इतिहास ज्ञात नाही. 18 व्या शतकात पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात लढाई चालू होती. त्यावेळी तुळाजीनी रामगड जिंकून घेतला होता. तेव्हा पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडी- कर यांचा जमाव खंडाजी मानकर यांनी एकत्र होऊ न फेब्रुवारी 1796 मध्ये रामगड जिंकला. इतर किल्ल्यांसह ब्रटिशांनी जिंकून घेतला. त्यावेळी गडावर 21 तोफा व 106 तोफगोळे असल्याचा उल्लेख मिळतो. गडाच्या मध्ये बालेकिल्ला आहे. त्याचे प्रवेशद्वार ढासळले आहे. त्याच्या प्रवेशद्वारासमोरील तटावर जाण्यास पायऱ्या आहेत. या तटावर काळ्या पाषाणातील गणपतीची सुबक मूर्ती आहे. गडाला 18 फूट उंचीचे 15 बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजाला 3 दिशांना खिडक्या आहेत. बुरुजांत 18 फूटी तटबंदी असून तीने पूर्ण किल्ल्याला वेढलेले आहे. तटबंदीची लांबी अंदाजे 640 मीटर आहे. गडावर किल्लेदाराच्या चौसोपी वाड्याचा चौथरा आहे, पण पाण्याची विहीर अथवा तलाव आढळत नाही. वाड्यात मधोमध तुळशी वृंदावन आहे. गड नदीच्या उगमाजवळ पोहोचताना भैरवगड दृष्टीस पडतो. आज प्राचीन घाटवाटा वापरात नसल्याने पुसट झाल्या आहेत. पण, या किल्ल्यांच्या माळेमुळे व्यापारी मार्गावर संशोधन करायला मदत नक्कीच होते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT