परतीच्या पावसामुळे गोड्या पाण्यातील माशांची मेजवानी pudhari photo
रायगड

Seasonal freshwater fish : परतीच्या पावसामुळे गोड्या पाण्यातील माशांची मेजवानी

स्थानिक बाजारपेठेत खरेदीसाठी खवय्यांची धाव; चक्रीवादळामुळे समुद्री मच्छीची आवक घटली

पुढारी वृत्तसेवा

सुधागड : संतोष उतेकर

परतीचा पाऊस साध्या जोरात सुरु आहे. त्यामुळे नदी, तलाव, ओहळ शेतातील साठलेले पाणी आदी गोड्या पाण्यातील मासेमारी जोरात सुरू आहे. सध्या गोड्या पाण्यातील विविध मासे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. खवय्यांच्या उड्या आता चविष्ट गोड्या पाण्यातील माशांवर पडत आहेत. हे मासे सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होत असल्याने खवय्यांना मेजवानी मिळत आहे.

नद्या, तलाव, धरण, पाणवठे, ओढे, ओहळ, शेतात साठलेले पाणी अशा गोड्या पाण्यात सापडणाऱ्या माशांची आवक देखील वाढली आहे. त्यामध्ये मळे, कोलीम, म्हूऱ्या, शिवडा, अरलय, वाम, कोलंबी, कटला, फंटूस व खवल आदी माशांचा समावेश आहे. मळे व म्हूऱ्या हा प्रकार या दिवसांत अधिक मिळतो. त्यामुळे खवय्ये आवर्जून खरेदी करतात. काहीजण तर मुंबई, ठाणे आदी शहरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना देखील भेट देतात.

कोळी बांधवांबरोबरच प्रामुख्याने आदिवासी आणि गळभोई समाजातील लोक खुप मेहनतीने हे मासे व चिंबोऱ्या पकडतात. हे विकुन त्यांच्या हाती चार पैसे मिळतात. नदी, तळा, धरण येथे टायर ट्यूबवर बसून गाळाने व जाळी टाकून मासेमारी होते. तर शेतातील साठलेले पाणी काढून मासे पकडले जातात. सध्या मासे देखील खूप मिळत आहेत. त्यामुळे उदरनिर्वाह चांगला सुरू आहे.

माणगाव येथील गृहिणी प्रियांका हेमंत गोसावी यांनी सांगितले की, सध्या गोड्या पाण्यातील मासे बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. शहरात असणाऱ्या नातेवाईकांना आवर्जून भेट म्हणून गोडे मासे नेले आहेत. मळे, शिवडा, कटला व म्हूऱ्या हे मासे अनेकांना खूप आवडतात. दरम्यान, वादळी वातावरणामुळे समुद्रातील मासेमारी कमी झाली आहे. त्यामुळे खाऱ्या पाण्यातील मच्छीचे भाव वाढले आहेत.

जिल्ह्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या किंमती

मळे - या वर्षी 50 ते 80 रुपये पाव तर 200 ते 250 रुपये किलो. कोलीम (बारीक कोळंबी) - यावर्षी 50 ते 60 रुपये वाटा. (मागील वर्षी 30 रुपये वाटा - एका पानावर वाटा असतो)

म्हूऱ्या - यावर्षी 40 रुपये वाटा, मागील वर्षी 30 रुपये वाटा (एका पानावर वाटा असतो),शिवडा, कटला व वाम - 500 ते 600 रुपये किलो., मोठी गोडी कोलंबी - या वर्षी 1000 ते 1200 रुपये किलो. फंटूस - या वर्षी 300 ते 400 रुपये मागीलवर्षी 200 ते 250 रुपये किलो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT