सुधीर नाझरे
मुरुड जंजिरा: यावर्षीचा मच्छीमारचा हंगाम दुष्काळीच गेला. सतत वादळी पाऊस, हवामानात होणारे बदल आणि एलईडीच्या बोटींची अनधिकृत मासेमारीमुळे स्थानिक कोळी बांधवांना खोल समुद्रात जाऊन देखील मासे मिळत नसल्याने हात हलवत परतावे लागते. आता आला पावसाळा बोटीवरील खलाशी सुरवातीची काही दिवस बोटीतील जाळी काढून स्वच्छ करून बोटी पावसापासून सुरक्षित ठेवण्यात जातात.
राजपुरी येथील कोळीबांधवांनी आपल्या बोटी पारंपरिक पध्दतीनीने किनारी ओढल्या. नंतर सुरु होतो उपजीविकेचा प्रश्न. त्यावर उपाय म्हणून किनाऱ्यावर जाळी टाकून उसळत्या लाटांमध्ये आपला जीव धोक्यात टाकून किनारी मासे पकडून आपली उपजीविका चालवणे.
म्हणजे रापण मासेमारी. ज्यांना रापण धोक्याचे वाटते ते मच्छिमार रोजावर बिगारी कामाला जाऊन आपले पोट भरतात. यात देखील रापण करताना जाळ्यात मासे कमी समुद्रातील कचरा ऑईल जास्त येत असल्याने कोळी बांधवांवर संकट आहे.
रापण म्हणजे नक्की काय?
रापणीचे जाळे फारच मोठे असते. ते पाण्याचा मोठा भाग व्यापते. त्यामध्ये अडकलेलेच मासे मिळतात. त्या जाळ्याला दोन्ही बाजूंना पन्नास ते साठ वाव जाड काथ्याचा दोरखंड (टाकणी), पन्नास ते साठ पाटे (जाळ्यांचे तुकडे) जोडून, पंधरा फूट उंची राखली जाते. मधील घोळाच्या भागाला पाटे मजबूत लावले जातात.
जाळ्याच्या सुरुवातीला व दोरखंडाच्या शेवटी पंधरा फूट उंचीचा मजबूत उंडलीचा (बांबू) दांडका लावलेला असतो. त्यामुळे जाळे पाण्यात उभे सरळ राहण्यास मदत होई. जाळ्याच्या वरील भागात तरंग व खाली जडत्व लावलेले असत. जाळे जड शिशामुळे तळाला जाऊन उभे राही. मासे जाळ्याच्या बाहेर जाऊ शकत नसत.
जाळ्याच्या तरंगाची पूर्ण माळ कमी पाण्यात दिसत असे. पुढे मार्ग काढत जाळे टाकले जाई. जाळे अर्धवर्तुळाकार पसरल्यानंतर किनाऱ्याकडे वळे. त्यावेळी उरलेले जाळे व शेवटी, दोरखंड टाकला जाई. एक माणूस दुसऱ्या दोरखंडाचे टोक घेऊन, उसळत्या लाटांमध्ये किनाऱ्यावर येई. रापण ओढणे हे येरागबाळ्यांचे काम नव्हे.
त्याला कंबर मजबूत व ताकद भक्कम लागते. दोरखंड माणसांकडून त्यांचे पाय मातीत, वाळूत खोलवर रोवून ओढला जाई. ती माणसे फार श्रमाचे काम उपाशी पोटी करत असत. दोरखंडानंतर टांगूल येत असल्याने, जाळे किनारी आल्यावर जाळ्यात मासे मिळाले नाही तर पुन्हा हा कष्टच खेळ सुरु राहतो.
मासे पूर्णत: किनाऱ्यावर घेतल्यानंतर ज्यांना मासे विकत घ्यायचे असतात ती मंडळी पुढे सरसावत; पैसे देऊन मासे खरेदी करत. शिल्लक राहिलेले मासे सर्वांमध्ये वाटले जात. पावसाळी कोळीबांधवांच्या उपजीविकेसाठी लागणारे कष्टाचा अनुभव सामान्य माणसाला कधी समजणार हे महत्वाचे आहे.
पुढील दोन महिने उदरनिर्वाहाचा प्रश्न
आता कोळी बांधव रोज सकाळी 4 वाजता उठून समुद्राच्या भरतीवेळी उसळल्या लाटांमध्ये मोठी लांब जाळी खान्द्यावर घेऊन जातात एक जाळीला पकडण्यासाठी 20 ते 30 तरुण बांधव लागतात. दुपारपर्यंत रापण करून जे मासे मिळतात ते विकून आपला वाटा घेऊन घरी यायचे असा दिनक्रम पुढील 2 महिने सुरु राहणार. जे शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत ते बांधव गवंडी कामात व पेंटिंग कामात लागतात, अशी कोळी बांधवांची स्थित पूर्वी नव्हती.
मुरुडमध्ये मच्छिमार बोटी 300 आहेत परंतु त्यातील 50 बोटींना काम आहे. बाकीच्यांना खलाश्याचे पगार देणे होत नाही. अनधिकृत मासेमारी मुरुडचा कोळी बांधव खचला आहे. आता तर पावसाळा सुरु झाला. बोटी किनारी आल्या आहेत.- प्रकाश सरपाटील, मच्छिमार