Devendra Fadnavis  Pudhari
रायगड

Devendra Fadnavis | फेडेक्सच्या ‘मेगा’ कार्गो हबमुळे महाराष्ट्र जागतिक व्यापार नकाशावर; लॉजिस्टिक्स क्षेत्रात नवे पर्व : मुख्यमंत्री

जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी FedEx ची २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक

पुढारी वृत्तसेवा

FedEx Mega Cargo Hub Navi Mumbai

पनवेल : आजचा सोहळा हा केवळ भूमिपूजनाचा नसून महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स इतिहासात नवे सुवर्णपान लिहिण्याचा क्षण आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील अत्याधुनिक एअर कार्गो हबच्या भूमिपूजन प्रसंगी भावना व्यक्त केल्या.

जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी FedEx सुमारे २,५०० कोटी रुपयांची दीर्घकालीन गुंतवणूक करत नवी मुंबई विमानतळावर पूर्णपणे स्वयंचलित कार्गो हब उभारणार आहे. हा प्रकल्प Adani Airport Holdings Limited यांच्या भागीदारीत साकारला जाणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, जागतिक व्यापार व्यवस्थेत सध्या मोठे बदल घडत आहेत. पुरवठा साखळीचे पुनर्मूल्यांकन, नव्या व्यापारनीती आणि जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर फेडेक्ससारख्या कंपनीची भारतातील गुंतवणूक ही देशाच्या आर्थिक स्थैर्याची आणि विकासक्षमतेची पावती आहे. परिवर्तनाच्या या काळात योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घेतलेला हा निर्णय आहे, असे ते म्हणाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भविष्यात देशातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक ठरेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्ही क्षेत्रांत हे विमानतळ पश्चिम भारताचे प्रवेशद्वार ठरणार आहे. फेडेक्सचे टर्मिनल येथे उभारले जाणे हा प्रकल्प अधिक बळकट करणारा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्गो हबचे बांधकाम सुमारे ३ लाख चौरस फूट क्षेत्रावर होणार असून, अत्याधुनिक स्वयंचलित सॉर्टिंग प्रणाली, डायमेंशनल स्कॅनिंग, हाय-स्पीड स्क्रीनिंग तंत्रज्ञान आणि समर्पित विमान पार्किंग बेस यांचा समावेश असेल. इनबाउंड व आउटबाउंड शिपमेंटची एकाच वेळी प्रक्रिया होऊन ट्रान्झिट वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्माण, अभियांत्रिकी वस्तू आणि नाशवंत मालाच्या निर्यातीसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशातील उच्च लॉजिस्टिक्स खर्च हा आर्थिक वाढीसमोरील मोठा अडथळा असल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हा खर्च कमी करणे आवश्यक असून, फेडेक्ससारख्या कंपन्या या परिवर्तनात नेतृत्व करू शकतात, असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे उत्पादन राज्य असल्याने या प्रकल्पामुळे निर्यात वाढीस चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

औद्योगिक कॉरिडॉर आणि मल्टीमॉडल वाहतूक नेटवर्कच्या जवळीकतेमुळे हा हब भारताला आग्नेय आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिका या बाजारपेठांशी अधिक सक्षमपणे जोडणार आहे. विमानतळाची प्रारंभिक कार्गो हाताळणी क्षमता दरवर्षी ०.५ दशलक्ष मेट्रिक टन असून, पुढील टप्प्यात ती ३.२५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्याचा आराखडा आहे.

या प्रकल्पामुळे सुमारे ६,००० हून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. एमएसएमई क्षेत्रासाठी निर्यात-आयात प्रक्रिया सुलभ होऊन उद्योगांना गती मिळेल. लॉजिस्टिक्स खर्चात कपात आणि जलद टर्नअराउंड वेळेमुळे उद्योगपरिसंस्थेला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मुंबई महानगर प्रदेश हा भारताच्या विकासाचे इंजिन आहे. २०४७ पर्यंत भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या उद्दिष्टात अशा प्रकल्पांचे मोठे योगदान राहील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी फेडेक्स व अदानी समूहाचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT