अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने अजफान इंटरनॅशनल रिटेल्स एलएलपी कंपनीच्या विविध अन्नपदार्थांचा एकूण ४ कोटी २१ लाख ६ हजार ९६१ रुपये किमतीचा खाद्यसाठा जप्त केला. Pudhari News
रायगड

Panvel News : पनवेलमध्ये 'अन्न व औषध प्रशासना'ची धडक कारवाई; ४ कोटी २१ लाख रुपयांचा खाद्यसाठा जप्त

मिसब्रँडेड व निकृष्ट दर्जाचा संशय; अजफान इंटरनॅशनल रिटेल्स एलएलपी कंपनीवर छापा

पुढारी वृत्तसेवा

Panvel FDA Raid News

पनवेल, पुढारी वृत्तसेवा : येथे दिवाळी व आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) अजफान इंटरनॅशनल रिटेल्स एलएलपी कंपनीच्या विविध अन्नपदार्थांचा एकूण ४ कोटी २१ लाख ६ हजार ९६१ रुपये किमतीचा खाद्यसाठा जप्त केला. संबंधित अन्‍नपदार्थांचा साठा मिसब्रँडेड असल्याचे तसेच निकृष्ट दर्जाचे असण्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली.

अन्नपदार्थ मिसब्रँडेड तसेच निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय

पनवेलमधील कामोठे येथे अजफान इंटरनॅशनल रिटेल्स ही कंपनी आहे. या कारवाईदरम्यान श्री. कृष्णउन्नी ई. जी. मेनन यांच्याशी संबंधित कंपनीच्या अन्नसाठ्याची तपासणी करण्यात आली. या प्रकरणात अन्नपदार्थांच्या लेबलिंग व गुणवत्तेबाबत आढळलेल्या बाबींच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २३, २६ व २७ अंतर्गत तरतुदींच्या उल्लंघनाच्या अनुषंगाने सहआयुक्त (अन्न) श्री. सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) श्री. ए. ए. मैत्रे आणि श्री. एम. आर. महांगडे यांनी ही कारवाई केली.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार कारवाई

या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती पी. ए. भंडारकर यांच्यासह श्री. यू. एस. बडे (अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्तवार्ता विभाग, कोकण विभाग), श्री. जी. एम. साबळे (अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्तवार्ता विभाग, मुख्यालय), श्रीमती पावसकर, श्री. आढाव, श्री. इघारे, श्री. माने, श्रीमती गावडे आणि श्रीमती मुलानी यांनी सहभाग घेतला. या प्रकरणात श्रीमती प्रिती टिपरे, सह आयुक्त (दक्षता) व सचिन जाधव, सह आयुक्त (कोकण विभाग), ठाणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई

दिवाळी व सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT