FDA License Raigad Pudhari
रायगड

FDA License Raigad: रायगडातील पर्यटन व्यवसायीकांना परवान्यांसाठी हवी मुदत वाढ

एफडीएची कारवाई योग्यच, परवान्यांसाठी प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शनाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: पर्यटक आणि नागरिकांना आरोग्यदायी अन्न पदार्थ मिळणे हा त्यांचा हक्क असल्याने,अन्न व औषध प्रशासनाने अन्न पदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायीकांचे परवाने तपासण्याची मोहीम राज्यभरात सूरु आहे. याच मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यात देखील परवाने तपासणी मोहीम सूरु करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील घरगुती अन्नपदार्थ तयार करणारे, खानावळ, छोटे व्यवसायीक यांच्याकडे एफडीएचे परवाने नसल्याने ते करुन घेण्यासाठी मार्गदर्शन आणि मुदत मिळावी अशी मागणी या छोट्या पर्यटन व्यावसायीकांकडून करण्यात येत आहे.

कोकणी पद्धतीचे ताजे मासे, मच्छीचे कालवण, भाकरी आणि अस्सल घरगुती जेवणाची चव घेण्यासाठीही पर्यटक मोठ्या आवडीने रायगडमध्ये येतात. पर्यटकांची हीच आवड लक्षात घेऊन जिल्ह्यातील गावोगावी तसेच पर्यटनस्थळांच्या परिसरात अनेकांनी घरगुती खानावळी, छोटी हॉटेल्स आणि भोजनालये सुरू केली आहेत.

महिलांच्या बचत गटांना सुगीचे दिवस आले. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) परवाना तपासणी आणि कारवाईमुळे या घरगुती खानावळचालकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, परवान्याअभावी काही व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. परिणामी परवान्यांसाठी प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी मुदत आणि मार्गदर्शनाची मागणी या किनारी भागातील व्यावसायिकांतून होते आहे.

रायगडमध्ये येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक खाद्यसंस्कृती वेगळे महत्व आहे. यामध्ये घरगुती खानावळींची महत्त्वाची भूमिका आहे. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, काशीद, मांडवा, दिघी यांसह विविध पर्यटनस्थळांच्या परिसरात लहान-मोठ्या खानावळी पर्यटकांना आकर्षित करतात.

मोठ्या हॉटेल्सच्या तुलनेत या खानावळीत मिळणाऱ्या ताज्या माशांच्या पदार्थांना आणि पारंपरिक कोकणी जेवणाला पर्यटकांची विशेष पसंती असते. पर्यटन विभागानेही यास प्रोत्साहन दिल्याने स्थानिकांना रोजगाचे साधन निर्माण झाले आहे.

अनेक कुटुंबांनी आपल्या घरातूनच हा व्यवसाय सुरू केला आहे. काही जण हंगामी स्वरूपात, तर काही जण पर्यटन हंगामात अतिरिक्त उत्पन्नाचे साधन म्हणून खानावळ चालवतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच महिलांनाही या व्यवसायातून आर्थिक हातभार लावता येत आहे. मात्र, अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या परवान्यांची पूर्तता अनेकांकडून झालेली नसल्याचे प्रशासनाच्या तपासणीत समोर येत आहे.

सध्या राज्यात एफडीएकडून कारवाई सुरु आहे. या कारवाईमुळे परवाना नसलेल्या खानावळचालकांमध्ये व्यवसाय बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः अल्प भांडवलावर घरगुती पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांना परवाना प्रक्रिया, नियम आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अडचणीचे ठरत आहे.

त्यामुळे कारवाई करण्याआधी अशा व्यावसायिकांना नियमांची माहिती देऊन परवाना घेण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी मागणी काशिद किनाऱ्यांवरील व्यावसायिकांकडून होत आहे.

अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि ग्राहकांचे आरोग्य यासाठी एफडीएची तपासणी आणि कारवाई महत्त्वाची आहे.

कारवाईपूर्वी मार्गदर्शनाची गरज

अन्न सुरक्षा नियमांचे पालन व्हावे, यासाठी प्रशासनाने खानावळचालकांमध्ये जनजागृती करून परवाना घेण्याची प्रक्रिया सुलभ करावी. नियमांचे पालन करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई, असा समतोल साधल्यास अन्नसुरक्षेबरोबरच रायगडची स्थानिक खाद्यसंस्कृती आणि पर्यटन व्यवसायही टिकवता येईल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT