

मुंबई: मुंबईतील सर्वच निवासी इमारतींना छोट्या लिफ्ट बसवण्यात येतात. त्यामुळे एखाद्या उंच इमारतीतील शेवटच्या मजल्यावर राहणारा एखादा व्यक्ती आजारी पडल्यास अथवा निधन झाल्यास त्याला छोट्या लिफ्टमधून इमारतीच्या खाली आणणे जिकरीचे जाते.
त्यामुळे इमारतींना स्ट्रेचर लिफ्ट बसवणे बंधनकारक करण्याचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. हा ठराव आता राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये इमारतींची उंची गगनाला भिडत आहे. अशा इमारतींमध्ये आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण, जेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच अपघातग्रस्त नागरिकांना तातडीने सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत.
सध्याच्या सर्वच निवासी इमारतींतील लिफ्टचा आकार लहान व अपुरा असल्यामुळे स्ट्रेचर किंवा अन्य वैद्यकीय उपकरणांसह रुग्णाला लीफ्टमधून सुरक्षितपणे खाली आणणे शक्य होत नाही. अनेकदा नाईलाजाने रुग्णांना जिन्याद्वारे खाली आणावे लागते.
त्यामुळे बराच कालावधी लागून रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होतो. अग्निशमन दलालाही आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण होतात. एखाद्याचे निधन झाल्यास त्याचे पार्थिव इमारतीखाली आणताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
इमारतीतील नागरिकांना उद्भवणाऱ्या या अडचणी दूर करण्यासाठी नवीन इमारतींना बांधकाम परवानगी देताना दहा फूट लांब व पाच फूट रुंद स्ट्रक्चर लिफ्ट बसवणे अनिवार्य करण्यात यावे, असा ठराव महापालिका सभागृहात संमत करण्यात आला होता.
हा ठराव महापालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आला असून प्रशासनामार्फत तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार, यावर लिफ्टचे आकारमान अवलंबून आहे.
स्ट्रेचर लिफ्ट असणे आवश्यक
उंच इमारतींना सर्व लिफ्ट मोठ्या करणे शक्य नसल्या तरी किमान एक स्ट्रेचर लिफ्ट असणे आवश्यक आहे. या लिफ्टचा वापर केवळ गंभीर आजारी म्हणजेच ज्या रुग्णाला स्ट्रेचरवरून आणावे लागेल, अशांसाठीच करावा, अशी अट टाकणे शक्य आहे. परंतु तशी राज्य सरकारकडून परवानगी मिळणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.