अलिबाग: नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि शेतीमालाला मिळणारा कमी भाव यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ८ हजार ९१४ पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.
जिल्ह्यातील पात्र कर्ज खात्यांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यांची माहिती शासनाच्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. केवळ थकीत कर्जदारांनाच नव्हे तर वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाने प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांकडून घेतलेल्या पीक कर्जालाही या योजनेचा लाभ लागू होणार आहे.
कर्जमाफीसोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शासनाचा निर्णय हा आर्थिक शिस्तीला प्रोत्साहन देणारा ठरणार आहे.
पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्राप्त झाल्यानंतर त्या संबंधित सेवा संस्था, ग्रामपंचायत, बँक शाखा, सहायक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांनी 'आपले सरकार' सेवा केंद्र किंवा संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.- तनवीर पाटील, जिल्हा उपनिबंधक, रायगड