पनवेल ः कॉलगर्ल पुरवण्याच्या नावाखाली फेक वेबसाईटच्या माध्यमातून तामिळनाडू परिसरातील 18 नागरिकांची हजारो रुपयांची फसवणूक करणाऱ्या 13 जणांना पनवेल तालुका पोलिसांनी तिरुपुर सायबर पोलिसांच्या साहाय्याने अटक केली आहे.
तामिळनाडू मधील तिरुपुर सायबर पोलीस विभागाकडे काही जणांनी फेक वेबसाईटच्या माध्यमातून आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. यामध्ये एकूण 18 तक्रारदारांनी 53 हजार रुपये लुबाडल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे तिरुपुर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद रफिक सिकंदन व महिला उपनिरीक्षक कनक वल्ली व त्यांचे पथक तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेत असताना अशाप्रकारच्या गुन्ह्यासंदर्भात पाँडिचेरी व कोईम्बतूर येथे दोघा जणांना अटक झाली असून ते सध्या पुन्हा ऍक्टिव्ह झाले असल्याची माहिती त्यांना मिळाली.
यानुसार त्यांचा शोध घेतला असताना महाराष्ट्रातील पनवेल मधील इंडियाबुल्स या सोसायटीमध्ये ते वास्तव्यास असल्याचे माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात येऊन वपोनि गजानन घाडगे यांची भेट घेऊन त्यांना गुन्ह्यातील गांभीर्य सांगून पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या सायबर सेल व गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पथकाला साथीला घेऊन इंडियाबुल्स या सोसायटीमधील मेरीगोल्ड या इमारतीमधील आठव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये छापा टाकला असता तामिळनाडू परिसरात वास्तव्यास असलेले 13 जण येथे एकत्रितपणे राहत असल्याचे आढळून आले.
त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मोबाइलफोन, लॅपटॉप व इतर साहित्य आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रदीप याच्या माध्यमातून अश्याप्रकारेचे नियमित लोकांची फसवणूक करत असल्याचे आढळून आले. त्यात दोन मुख्य आरोपीसुद्धा आढळून आल्याने त्यांच्याविरोधात सायबर ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आले. सदर आरोपींना न्यायालयाच्या आदेशानुसार तिरुपुर सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
आपली घरे भाड्याने देताना घरमालकाने जागरूक राहावे. तसेच त्याची नोंद जवळच्या पोलीस ठाण्यात करावी. एजंटच्या माध्यमातून घरे भाड्याने देताना सुद्धा तो एजंट नोंदणीकृत आहे कि नाही याची खात्री करावी. त्याचप्रमाणे आपल्या शेजारी राहणाऱ्या परिवाराची वागणूक, वर्तणूक व वावर याकडे लक्ष ठेवावे. काही संशयास्पद आढळ्यास नजीकचे पोलीस ठाणे किंवा आपत्कालीन क्र 112 यांच्यावर संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येते .गजानन घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक