

उरण ः राजकुमार भगत
नवी मुंबईतील सिडको प्रशासित क्षेत्रातील पाणीटंचाई दूर करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे. सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा वृद्धी योजनेच्या कामाला मोठी गती मिळाली असून, पुढच्या आठवड्यात या प्रकल्पातील बोगद्याचे पहिले ब्रेकथ्रू (दोन टोके एकत्र येणे) होणार आहे. सिडकोच्या इतिहासातील हा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू ठरणार असल्याने या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई आणि आसपासच्या वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांमधील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन सिडकोने ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. भूगर्भातील कठीण आव्हाने आणि अभियांत्रिकी अडथळ्यांवर मात करत सिडकोने हा टप्पा गाठला आहे.
पाणीपुरवठा थेट 270 दशलक्ष लिटरवर जाणार या प्रकल्पामध्ये 13.25 किलोमीटर लांबीचा कच्च्या पाण्याचा बोगदा आणि 15.4 किलोमीटर लांबीचा शुद्ध पाण्याचा बोगदा बांधला जात आहे. सध्या या योजनेतून 120 दशलक्ष लिटर,पाणीपुरवठा होतो, जो हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर थेट 270 दशलक्ष लिटर पर्यंत पोहोचणार आहे. यामुळे निवासी संकुलांसह व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल.
100 मीटर खोलीवर आव्हानात्मक काम बोगद्याचा हा ऐतिहासिक ब्रेकथ्रू वहाळ गावाजवळील शाफ्ट-4 येथे होणार आहे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमार्फत हे काम सुरू आहे. जमिनीखाली 100 मीटर खोलीवर, सह्याद्रीच्या कठीण पाषाणात हे खोदकाम करण्यात आले आहे. जागेची कमतरता आणि राडारोडा बाहेर काढण्याचे कठीण आव्हान सिडको आणि अफकॉन्सच्या अभियंत्यांनी यशस्वीपणे पेलले आहे.
नवी मुंबईकरांना दिलासा
नॅशनल रेकॉर्डची नोंद या प्रकल्पादरम्यान फ्लेमिंगो या 3.2 मीटर व्यासाच्या टनेल बोअरिंग मशीनचा वापर करण्यात आला. अफकॉन्सने याच प्रकल्पात एका महिन्यात तब्बल 777 मीटर बोगदा खोदून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी मे महिन्यात 714 मीटर खोदकामाचा विक्रम याच प्रकल्पाच्या नावे होता. पुढील आठवड्यात होणाऱ्या या ब्रेकथ्रूमुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असून, येत्या काळात सिडको क्षेत्रातील पाणीटंचाई इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.