रायगड

शिक्षिकेला फेसबुकप्रेम पडले महागात..! ३०.९६ लाखांचा गंडा

मोहन कारंडे

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : फेसबुकच्या माध्यमातून विदेशी मित्राच्या प्रेमात पडलेल्या महिला शिक्षिकेला फेसबुकवरच प्रेम चांगलच महागात पडले आहे. फेसबुकवरील प्रियकराने या शिक्षिकेला तब्बल ३० लाख ९६ हजारांचा गंडा घातला आहे. प्रियकराने विदेशातून पनवेलमध्ये पाठवलेले गिफ्ट घेण्यासाठी शिक्षिकेने तब्बल ३० लाख ९६ हजर रुपये खर्च केले. मात्र शिक्षिकेला ना पाठवलेले गिफ्ट मिळाले ना प्रियकर मिळाला. याप्रकरणी शिक्षिकेने प्रियकराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

फसवणूक झालेली शिक्षिका ही पनवेलमधील रहिवाशी असून ती पनवेलमधील एका नामांकित शाळेत काम करते. मार्च २०२४ मध्ये या शिक्षिकेला फेसबुकवर डॉ. फेलेशिया प्रिस या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट दिसली. ही रिक्वेस्ट शिक्षिकेने स्वीकारली आणि दोघांमध्ये संभाषण होऊ लागले. या फेसबुक चॅटींगच्या माध्यमातून या दोघांची चांगली मैत्री झाली आणि हळूहळू दोघांमधील संभाषण वाढत गेले. या दरम्यान या शिक्षिकेच्या मित्राने शिक्षिकेचा व्हाट्सअॅप नंबर मागितला आणि व्हाट्सअॅपवर बोलणे सुरू झाले. मित्राने शिक्षिकेला ओळख म्हणून डॉ. फेलेशिया प्रिंस ब्रिटिश असल्याचे सांगितले आणि माझी पत्नी अपघातात मयत झाली असून मला एक मुलगी आहे. ती माझ्या आई वडीला सोबत जर्मनमध्ये राहते आणि मी स्वतः इंग्लडमध्ये राहतो अशी ओळख सांगून महिला शिक्षिकेला भावनिक करण्याचा त्याने प्रयत्न केला. मी तुझा चांगला मित्र / भाऊ बनू शकतो असे बोलून शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ही शिक्षिका या प्रियकराच्या प्रेमात पडली.

या दरम्यान त्या विदेशी प्रियकराने महिला शिक्षकेसाठी भेटवस्तू घेतल्या आहे. ते तुला पाठवायच्या आहेत, त्यासाठी तुझा पत्ता सांग असे म्हणून त्या भेटवस्तूंचे फोटोही पाठवले. त्यात अॅपल फोन, लॅपटॉप, ज्वेलरी अश्या अनेक भेटवस्तूंचे फोटो पाठवले. जवळपास ६९ लाख रुपये याची किंमत असल्याचे त्याने सांगितले. या वस्तू कुरियरने पाठवतो असे सांगून तिला फसवण्यास सुरवात केली. गिफ्ट  पाठवल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत दिल्ली येथून या महिलेला कस्टम ऑफिसर बोलत आहे असा फोन आला आणि डॉ. फेलेशिया प्रिंस याने तुमच्यासाठी कुरियर केले आहे, त्याचे कस्टम चार्ज भरावे लागतील अशी माहिती शिक्षिकेला दिली. यावर शिक्षिकेने ५ हजार रूपये यूपीआयद्वारे पाठवले. त्यानंतर काही वेळातच तुम्हाला, फॉरेन मनी रजिस्ट्रेशन चार्ज भरावा लागेल तसेच कुरियर टॅक्स भरावा लागेल असे सांगितल्यानंतर या शिक्षिकेने तब्बल ४ लाख ७० हजार रुपये ऑनलाईन पाठवले. पुन्हा एशियन युनियन क्लियरींग सर्टिफिकेट चार्ज भरावा लागेल असे सांगितल्यावर या शिक्षिकेने माझ्याकडे पैसे नाहीत असे डॉ. फेलेशिया याला सांगितले आणि ते गिफ्ट व पैसे मला इंडियामध्ये कुरियर आणून देशील का असे विचारले.

अटक केल्याची मारली थाप

डॉ. फेलोशिया याने मी दिल्ली एयरपोर्टला आलो असून मला कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आणि आणि सर्व साहित्य जप्त केले आहे. आता हे साहित्य सोडवण्यासाठी लाखो रुपये भरावे लागतील असे सांगून वेगवेगळ्या पद्धतीने, कस्टम अधिकारी असल्याचे सांगून लाखो रुपये शिक्षिकेकडून घेतले. यावेळी जवळपास ३० लाख ९६ हजार रुपये एवढी रक्कम शिक्षिकेने डॉ. फेलेशियाला दिली. पैसे दिल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रियकर शिक्षिकेला फसवू लागल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षिकेने नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस या विदेशी प्रियकराचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT