rojgar hami yojana
‘रोहयो’तून फक्त 5 हजार मजुरांना रोजगार  file photo
रायगड

रोजगार हमी योजना : ‘रोहयो’तून फक्त 5 हजार मजुरांना रोजगार

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 222 कामे सुरू आहेत. या कामांमुळे 4694 हजार मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एकीकडे कामांची मागणी असताना म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही, असे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातून लाखो मजूर कामासाठी स्थलांतर करीत आहेत. (employment guarantee scheme)

महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत रायगड जिल्ह्यात तीन लाख 34 हजार 746 कामगारांनी आपली नोंद जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यामध्ये एक लाख 53 हजार 829 महिला मजुरांचा समावेश आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर रोजगार मिळविण्यासाठी एक लाख 86 हजार 492 अकुशल मजुरांनी यंदा नव्याने जॉबकार्डसाठी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी आतापर्यंत रायगड जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एक लाख 30 हजार 811 कामगारांना जॉबकार्ड देण्यात आले आहेत. जॉबकार्ड घेतलेल्या मजुरांमधील 26 हजार 928 मजूर नियमित कामासाठी धावणारे आहेत. तर, एकूण मजुरांपैकी 47 हजार 592 मजूर सक्रीय मजूर आहेत. यामध्ये 20 हजार 74 महिला मजुरांचा समावेश आहे.

रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागात नागरिक वीटभट्टी आणि अन्य कामांसाठी स्थलांतर करीत असतात. यावर्षी तर अनेक शेतकर्यांची कुटूंबे शेतावर उदरनिर्वाह भागत नसल्याने हाताला काम मिळत असल्याने कोळसा गोळा करण्यासाठी जातात. शंभर दिवस कामाची हमी असणार्या रोजगार हमी योजनेचा स्थलांतर रोखण्यासाठी मदत होऊ शकली असती. मात्र, मजुरांचा रोहयोतील कामांकडे येण्याचा ओघ कमी झाला आहे.

नैसर्गिक आपत्तीत गावागावातील बेरोजगारांवर घर सोडून परजिल्ह्यात जाण्याची वेळ येवू नये म्हणून रोहयोतून प्रशासनातर्फे कामे उपलब्ध करून दिली जातात. परंतु, सरकारी नोकरदारांना महागाईमुळे महागाई भत्ता वाढीव मिळाला, सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढही झाली, मात्र रोहयोत काम करणार्यांची मजुरी केवळ 17 रुपयांनी वाढली. भर उन्हात आणि पावसात काम करूनही दररोज 273 रुपयेच मजुरी मिळत आहे. जिल्ह्यात एक लाख 30 हजार 811 जॉब कार्डधारक मजूर आहेत.

यामधील 47 हजार 592 मजुरांनी कुठल्या न कुठल्या कामावर यापूर्वी काम केलेले आहे. म्हणजेच हे कार्यरत मजूर आहेत. आज घडीला जिल्ह्यात केवळ 222 रोजगार हमीची कामे सुरू आहेत. त्यावर 4 हजार 694 मजूर कामे करीत आहेत. यावरून रोजगार हमी आणि कामे कमी अशी अवस्था या योजनेची झाली आहे.

63 ग्रामपंचायतींमध्ये 127 घरकुलांचे कामे सुरु असून त्या कामांवर 2 हजार 897 मजुरांना रोजंदारी मिळाली आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यात एका ग्रामपंचायतीमध्ये 1 घरकुलावर 21 मजूर , उरण तालुक्यात 1 ग्रामपंचायतीमध्ये 2 घरकुलांवर 14 मजूर , पेण तालुक्यात 2 ग्रामपंचायतीमध्ये 3 घरकुलांवर 206 मजूर , कर्जत तालुक्यात 9 ग्रामपंचायतीमध्ये 37 घरकुलांवर 888 मजूर, खालापूर तालुक्यात 6 ग्रामपंचायतीमध्ये 12 घरकुलांवर 259 मजूर , रोहा तालुक्यात 8 ग्रामपंचायतीमध्ये 17 घरकुलांवर 156 मजूर, सुधागड तालुक्यात 6 ग्रामपंचायतीमध्ये 6 घरकुलांवर 420 मजूर, माणगाव तालुक्यात 3 ग्रामपंचायतीमध्ये 8 घरकुलांवर 142 मजूर, महाड तालुक्यात 3 ग्रामपंचायतीमध्ये 4 घरकुलांवर 32 मजूर, म्हसळा तालुक्यात 11 ग्रामपंचायतीमध्ये 22 घरकुलांवर 534 मजूर, मुरूड तालुक्यात 7 ग्रामपंचायतीमध्ये 9 घरकुलांवर 54 मजूर, तळा तालुक्यात 4 ग्रामपंचायतीमध्ये 4 घरकुलांवर 121 मजूर आणि श्रीवर्धन तालुक्यात 2 ग्रामपंचायतीमध्ये 2 घरकुलांवर 50 मजूर रोजंदारीवर काम करीत आहेत.

8 ग्रामपंचायतींमध्ये फळबाग लागवडीचे नियोजन करून 11 ठिकाणी काम सुरु करण्यात आले असून 83 मजुरांना रोजगार मिळाला आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यात 6 ग्रामपंचायतींमध्ये सुरु असलेल्या 9 कामावर 28 मजूर, मुरूड तालुक्यात एका ग्रामपंचायतीमधील एका कामावर 41 मजूर, तळा तालुक्यात एका ग्रामपंचायतीमधील एका कामावर 14 मजुरांना रोजंदारीची संधी मिळाली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येत आहे. या तीन कामांवर 165 मजूर कामावर आहेत. यामध्ये कर्जत एका ग्रामपंचायतमध्ये सुरु असलेल्या एका कामावर 56 मजूर, पनवेल तालुक्यात एका ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरु आहेत.

मजुरीत 20 रुपयांची वाढ

आता रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांच्या रोजंदारीमध्ये 20 रुपयांनी वाढ झाली आहे. आता रोजगार हमी योजनेवरीला अकुशल मजुरांना 253 रुपयांऐवजी आता 273 रुपये मजुरी मिळणार आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत जॉब कार्ड मिळविलेल्या 4 हजार 694 मजुरांनी 222 कामांवर रोजंदारी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सुरु असेलल्या घरकुलाच्या कामांवर मजुरांनी जाणे पसंत केले असून सर्वाधिक 2 हजार 897 मजूर घरकुल बांधण्याच्या कामावर मजुरीसाठी जात आहेत.

222 कामे सुरू

222 कामे सुरु आहेत. 102 ग्रा.पं.मध्ये सुरु असलेल्या कामांमधून 4 हजार 694 मजुरांना रोजंदारी मिळाली. 127 घरकुलाच्या कामावर 2 हजार 897 मजुरांना रोजंदारी मिळाली आहे.

SCROLL FOR NEXT