Raigad Crime News pudhari photo
रायगड

Raigad Crime : नेरळ साईनाका येथे वृद्धाची फसवणूक; २ लाखांची रोख रक्कम लांबवली

अज्ञात चोरटे सीसीटीव्हीत कैद; नेरळ पोलिसांकडून तपास

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील साईनाका परिसरात एका वृद्ध व्यक्तीची लबाडीने फसवणूक करून त्यांच्या जवळील तब्बल २ लाख रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

कोल्हारे गाव हद्दीत राहणारे एक वृद्ध नागरिक नेरळ पूर्व येथील साईनाका परिसरातील एका किराणा दुकानाबाहेर स्टुलवर बसले होते. त्यावेळी दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर नजर ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने चोरीचा डाव आखला. यातील एका इसमाने वृद्धांच्या समोर काही पैसे टाकून "तुमचे पैसे पडले आहेत" असे सांगितले. त्यानंतर तो किराणा दुकानात शिरला.

दरम्यान, दुकानात आधीपासूनच दबा धरून बसलेल्या दुसऱ्या इसमाने वृद्ध व्यक्ती पैसे उचलण्यासाठी पुढे गेल्याचा फायदा घेत त्यांच्या जवळ ठेवलेली पिशवी उचलली आणि दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.

चोरी झालेल्या पिशवीमध्ये संबंधित वृद्धांनी बँकेतून नुकतीच काढलेली २ लाख रुपयांची रोख रक्कम होती. काही वेळातच हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.तक्रारीनंतर नेरळ पोलिसांनी संबंधित बँक तसेच किराणा दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता,रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन जाणारा आणि त्याचा साथीदार स्पष्टपणे दिसून आला आहे.

त्यामुळे या दोन्ही चोरट्यांनी बँकेपासूनच वृद्ध व्यक्तीवर पाळत ठेवून त्यांची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे करीत आहेत.या प्रकारामुळे नेरळ परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.

मोठ्या रकमेचे बँक व्यवहार करताना विशेषतः वृद्ध व्यक्तींना एकटे पाठवू नये. तसेच अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहून कुटुंबातील जाणकार व्यक्तींनी त्यांच्यासोबत राहावे. अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
राहुल वरोटे , पोलीस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT