रायगड : जयंत धुळप
दरवर्षी पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत मध्य आशिया, सायबेरिया, युरोप आणि हिमालयाच्या पलीकडील प्रदेशांतून सुमारे १४७ प्रजातींचे परदेशी पाहुणे पक्षी रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीत स्थलांतर करून येतात. मात्र, यंदा 'अल निनो' आणि पर्यावरणीय बदलांमुळे जागतिक हवामान चक्रात मोठे बदल झाले असून, त्याचा थेट फटका कोकणातील पक्षी स्थलांतराला बसला आहे.
पक्षी अभ्यासक आणि ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांनी केलेल्या निरिक्षणातून , यंदा परदेशी पक्षी त्यांच्या नेहमीच्या वेळेनुसार दाखल झाले असले तरी त्यांच्या एकूण संख्येत चिंताजनक घट झाली आहे. हंगामाचा पहिला टप्पा उलटूनही जिल्ह्यात १४७ पैकी केवळ ८०ते ८५ प्रजातींचेच पक्षी दाखल झाले असून, ५० हून अधिक प्रजाती अद्याप मोठ्या संख्येने पोहोचलेल्या नाहीत.
स्थलांतरित शिकारी पक्षी आणि करकोच्यांच्या संख्येवरही यंदा मोठा परिणाम झाला आहे. पांढरा युरोपीयन करकोचा यंदा अद्याप कोकण किनारपट्टीत दाखल झालेला नाही.कोकण किनारपट्टीवर म्हसळा आणि दिवेआगर भागात दरवर्षी ६ ते ८ च्या संख्येने येणाऱ्या युरेशियन ग्रिफॉन व्हल्चर (गिधाड) पैकी यंदा केवळ एकच पक्षी दिसला आहे. गेल्या वर्षी उरण आणि नेहरू पोर्टच्या लाईटहाऊस परिसरात युरोपियन गिधाडांची नोंद होऊन त्यांना वाचवण्यात आले होते, मात्र यंदा त्यांचा वावर आढळलेला नाही.
दरवर्षी ९ ते ११ च्या संख्येने येणारे इजिप्शियन गिधाडही यंदा एकटे-दुकटेच दिसत आहेत, तर पूर्व भारतातून येणारी काळी गिधाडे (सिनेरियस व्हल्चर) कोकणात न येता मध्य प्रदेशापर्यंतच मर्यादित राहिली आहेत. स्पेन, जर्मनी, फ्रान्स आणि पोर्तुगालमधून येणारे युरोपियन स्टॉर्क (करकोचा) पूर्वी नागोठणे ते जेएसडब्ल्यू प्लांटच्या खारफुटीत ५० ते १०० आणि महाडमधील वीर रेल्वे स्टेशन व एमआयडीसी परिसरात २० ते ५० च्या संख्येने दिसायचे, त्यांचे प्रमाणही घटले आहे. या संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीत केवळ अमूर फाल्कन या पक्ष्याचे आगमन चांगले झाले असून नागालँडमधील अहवालांनुसार ते एक ते दीड लाखांच्या संख्येने आपल्या देशात दाखल झाले आहेत.
हजारोंचे थवे कमालीचे रोडावले...
सध्या अलिबाग, किहीम, रेवस, मांडवा, मुरुड, नागाव, हरिहरेश्वर आणि उरणच्या पाणजे पाणथळ परिसरात सीगल (कुरव), चक्रवाक, चमचा (स्पूनबिल), शेकाट्या आणि सुरय (टर्न) हे पक्षी विहार करताना दिसत आहेत. मात्र, उत्तर ध्रुवीय प्रदेश, उत्तर युरोप आणि मंगोलियातून हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पक्ष्यांचे थवे यंदा कमालीचे रोडावले आहेत.
दिवेआगर व लगतच्या किनारपट्टीवर दरवर्षी २५ हजार ते ५० हजारांच्या संख्येने येणारे गोडविट आणि इतर किनारपट्टीचे पक्षी यंदा केवळ २०० ते ३०० च्या संख्येतच पाहायला मिळत आहेत. मंगोलियातून पूर्वी ५ ते १० हजारांच्या संख्येने येणारे मंगोलियन प्लोर, लिटिल स्टिंट आणि लिटिल रिंग प्लोर यंदा केवळ काही शेकडोंवर आले असून, मंगोलियन प्लोर तर फक्त ५० ते १५० च्या संख्येनेच दिसत आहेत.
उत्तर युरोपातून किमान ५०० च्या संख्येने येणारे व्हिम्ब्रेल आणि कर्लू हे पक्षी तसेच उत्तर ध्रुवीय प्रदेशातून येणारा टर्नस्टोन पक्षी यंदा केवळ एकटे-दुकटेच दिसत आहेत. उत्तर रशियातून येणारा मार्श सँडपायपर पूर्वी महाडच्या आतील खाडीपट्ट्यात आणि तलावांवर सहज दिसायचा, परंतु यंदा त्याचे केवळ २ ते ३ पक्षीच निदर्शनास आले असून त्यांचे दर्शन फक्त समुद्रकिनाऱ्यापुरतेच मर्यादित राहिले असल्याचे प्रमेसागर मेस्त्री यांनी सांगीतले.