

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कॅसिनो संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबारप्रकरणी एकूण दहाजणांना क्राईम ब्रँचने अटक केली असून ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. एकालाही जामीन मिळालेला नाही. या घटनेला अडीच महिने उलटले तरी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार तसेच त्यामागील हेतू अजूनही गुलदस्त्यात आहे.
२८ ऑगस्ट रोजी झालेल्या गोळीबाराला अडीच महिने उलटले, तरी या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात होता आणि हल्ल्याचे कारण काय, याचे ठोस उत्तर अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणात क्राईम ब्रँचकडून आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली असली, तरी हल्ल्याचा कथित सूत्रधार अथवा हल्ल्याची सुपारी कोणी दिली, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी २० दिवसांची मुदत जवळ येत असताना तपास यंत्रणेकडे अटक केलेल्या आरोपींची संख्या वाढली आहे; मात्र हल्ल्यामागील हेतू आणि कथित कटाचा उलगडा अद्याप झालेला नाही.
अलीकडेच क्राईम ब्रँचने उत्तर प्रदेशातून रवी ऊर्फ निखिल सिंह याला अटक केली. त्याआधी व्यावसायिक सतीश शिंदे याला अटक करण्यात आली होती. गोळीबारानंतर फरार असलेला गोपाल नाईक यालाही कोळ्ळेम तपासणी नाक्यावर पकडण्यात आले. नाईकने साधूचा वेश धारण करून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तो या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅसिनो संचालकांनी हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर मागितलेल्या पोलीस संरक्षणासह सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. आरोपींची चौकशी करून हल्ल्यामागील हेतू, त्यांची हालचाल आणि संभाव्य साथीदारांशी असलेले संबंध शोधले जात आहेत. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असले तरी तपास सुरू असल्याने सध्या कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
२८ ऑगस्टच्या संध्याकाळी कॅसिनो मॅजेस्टिकच्या प्रवेशद्वाराजवळ हा गोळीबार झाला होता. दोन सशस्त्र हल्लेखोरांनी श्रीनिवास नाईक आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. मात्र, दोघेही या हल्ल्यातून सुखरूप बचावले. तपासात हल्लेखोर पार्किंग परिसरात सुमारे तासभर थांबले होते. नाईक कारजवळ पोहोचताच त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
तपासास अडीच महिने पूर्ण
हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी प्राथमिक तपासात खंडणीसाठी हा हल्ला झाल्याची शक्यता नाकारली होती. त्यानंतर हल्लेखोर सुपारी घेऊन आले होते का, तसेच त्यांना गोव्याबाहेरून आणण्यात आले होते का, या दिशेनेही तपास करण्यात आला. मात्र, अडीच महिन्यांच्या तपासानंतरही या हल्ल्यामागील खरा सूत्रधार कोण आणि श्रीनिवास नायक यांना लक्ष्य करण्यामागील नेमके कारण काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. २० दिवसांची आरोपपत्र दाखल करण्याची मुदत जवळ येत असल्याने क्राइम बॅचच्या पुढील तपासाकडे आता लक्ष लागले आहे.